विक्रमी ‘चॉकलेट बनाना’ शिल्प
जगप्रसिद्ध चॉकलेट अणि पेस्ट्री बनविणारे स्वयंपाकी अमारे गुईचोन यांनी एक नवा विक्रम नोंदविला आहे. या विक्रमाची नोंद गिनीज विक्रमपुस्तिकेत करण्यात आली आहे. गुईचोन यांनी 66 इंच, अर्थात साडेपाच फूट उंचीचे ‘चॉकलेट-बनाना’ खाद्यशिल्प निर्माण केले असून ते लोकप्रिय झाले आहे. या संबंधातील पूर्वीचा विक्रम त्यांनी आता मोडीत काढला असून त्यांनी या शिल्पाची निर्मिती त्यांनी अमेरिकेच्या लास वेगास शहरातील त्यांच्या पेस्ट्री निर्मिती केंद्रात केली आहे. हे खाद्यशिल्प कसे निर्माण करण्यात आले, याचा व्हिडीओही त्यांनी प्रसारित केला असून असंख्य दर्शकांनी तो पाहिला आहे. अत्यंत कौशल्याने त्यांनी हे साडेपाच फूट उंचीचे शिल्प केल्याचे या व्हिडीओत दिसून येते.
ही पाककृती निर्माण करण्यासाठी त्यांना अत्यंत संयमाने आणि चिकाटीने सारी प्रक्रिया पार पाडावी लागली. ही पाककृती अत्यंत नाजूक असल्याने कोठेही न मोडता किंवा न बिघडता ती साकारावी लागली. अनेकदा त्यांचे प्रयत्न वाया गेले. कारण इतक्या उंचीची पाककृती बराच काळ स्थिर किंवा घट्ट उभी राहू शकत नाही. तथापि अत्यंत दक्षतापूर्वक आणि नाजूक हातांनी काम करत सहा तासांच्या प्रयत्नांनंतर ती साकारली गेली. त्यामुळे तिची नोंद गिनीज विक्रमपुस्तिकेत करण्यात आली असून गुईचोन यांची या पुस्तकातील ही दुसरी नोंद आहे.