विवाहापूर्वीची अजब प्रथा
वराला पाजविली जाते दारू
भारत हा विविधतांनी नटलेला देश आहे. येथे भाषा, आहार अन् राहणीमान ठराविक अंतरानंतर बदलत असते. याचबरोबर परंपरा अन् प्रथाही बदलत असतात. भारताच्या प्रत्येक राज्यात विवाहावरून वेगवेगळ्या प्रथा आहेत. अनेक ठिकाणी विवाहानंतर वधूला छडीने मारले जाते, तर काही ठिकाणी वधूची आई स्वत:च्या जावयाचे नाक पकडते. परंतु काही प्रथांबद्दल कळल्यावर चकित व्हायला होते. यातील काही प्रथा विवाहापूर्वी तर काही नंतर पार पाडल्या जातात.
सर्वसाधारणपणे मुलीकडील लोक व्यसन न करणाऱ्या युवकाच्या शोधात असतात. परंतु एकेठिकाणी विवाहापूर्वी मुलीची आईच भावी जावयाला दारू पाजवत असते. यानंतर वधू अन् वरासोबत बसून पूर्ण परिवार मद्य रिचवित असतो. ही परंपरा छत्तीसगडशी संबंधित आहे. तेथे विवाहादरम्यान वधूची आई स्वत:च्या भावी जावयाला दारू पाजवत असते.
कवर्धा जिल्ह्याच्या बैगा आदिवासी समुदायात ही परंपरा आहे. येथे विवाहादरम्यान मद्यपानाची प्रथा पार पाडली जाते. मद्य पाजविण्याची सुरुवात वधूची आई करते आणि सर्वप्रथम वराला मद्या पाजवून प्रथा निभावते. परंपरेनुसार सासूनंतर स्वत: वधूही पतीला मद्य पाजवते. बैगा समुदायात वधू अन् वर एकत्र बसून मद्यपान करतात आणि त्यांच्यासोबत पूर्ण परिवारही यात सामील होतो. यानंतरच विवाहाचे अन्य विधी सुरु होतात. बैगा समुदायात कुठल्याही प्रकारची देवाणघेवाण होत नाही. म्हणजेच त्यांच्यात हुंड्यासारखी प्रथा नाही. तसेच अहेरही स्वीकारला जात नाही.