50 वर्षांनी जुळले स्नेहबंध
पणजी प्रोग्रेस हायस्कूलच्या 1975 सालच्या विद्यार्थ्यांची झाली अविस्मरणीय भेट
प्रतिनिधी/ पणजी
शालेय जीवनात खेळणे, बागडणे, अभ्यास, सहल यामध्ये रमून हायस्कूलचे अनुभव घेऊन विविध स्तरावर, नोकरीनिमित्त विविध ठिकाणी गेलेले 50 वर्षांपूर्वीच्या शालेय मित्र-मैत्रिणींचे 1975 नंतर पुन्हा एकदा स्नेहबंध जुळले. सुमारे अर्धशतकानंतर आपल्या वर्गमित्रांची झालेली भेट आणि त्यानंतर एकमेकांचे अनुभव, खुशाली याबाबत गप्पांचे कवाडे मनमोकळेपणाने एकमेकांसमोर खुले केल्याने ही भेट अविस्मरणीय अशीच ठरली.
पणजीतील प्रोग्रेस हायस्कूलच्या 1975 सालच्या तुकडीच्या विद्यार्थ्यांची नुकतीच एकाच ठिकाणी भेट झाली. याकामी हरी कामत यांनी घेतलेली मेहनत आणि प्रयत्न यामुळेच इतक्या वर्षांनी विद्यार्थी एकत्र भेटले. यावेळी 50 वर्षांपूर्वीचे प्राचार्य गंगाधर सरदेसाई, शिक्षक विठ्ठल नाईक, विश्वनाथ नाईक, इवेत बर्रेटो सिल्वेरा, अजित कोलवाळकर, गुरू सावंत तसेच विद्यमान मुख्याध्यापक मारिया रिबेलो ह्या व्यासपीठावर उपस्थित होत्या. गुऊवर्य आणि शिक्षकांशी झालेला वार्तालाप हा माजी विद्यार्थ्यांना सुखावून गेला. प्राचार्य गंगाधर सरदेसाई यांचे 95 वयोवर्ष होऊनही त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली हे विशेष.
50 वर्षांपूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांचे संपर्क क्रमांक, पत्ता प्राप्त करून पणजीतील एका हॉटेलात स्नेहमेळावा आयोजित केला. हा कार्यक्रम म्हणजे माजी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची पर्वणी असाच होता. या कार्यक्रमात प्रत्येकाने आपल्या कौटुंबिक जीवनाची माहिती देताना एकमेकांच्या खुशालीचीही चौकशी केली. स्नेहमेळाव्यासाठी उपस्थित राहिलेले सर्व शिक्षक, प्राचार्य यांचा यथोचित सन्मान म्हणून विद्यार्थ्यांनी त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला. त्यानंतर 50 वर्षांनंतर झालेली भेटीची आठवण म्हणून प्राचार्य सरदेसाई यांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव 50 वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला.
मनोगत व्यक्त करताना काही विद्यार्थ्यांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. जे शिक्षक हयात नाहीत, त्यांच्यासाठी प्रेम व्यक्त करताना अनेक विद्यार्थ्यांना गहिवरून आले. माजी विद्यार्थ्यांनी घडवून आलेल्या या स्नेहमेळाव्यात शिक्षक व प्राचार्यांचा सन्मान केला. दिवसभर चाललेल्या या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी हा अनुभव म्हणजे सर्वोच्च जीवनातील एक सुखद क्षण असल्याचे सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभलक्ष्मी रायकर, हरी कामत, महेश देसाई यांनी 50 वर्षांपूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना एकत्र करण्यासाठी परिश्रम घेतले.
आमच्यासाठी तुम्ही मुलांप्रमाणे : प्राचार्य सरदेसाई
50 वर्षांपूर्वी ज्या विद्यार्थ्यांवर आम्ही सुसंस्कार केले, त्याचीच पोचपावती म्हणून आज माजी विद्यार्थ्यांनी आम्हाला एकत्र करण्याचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. 50 वर्षांपूर्वीचे जुळलेले गुरु-शिष्याचे नाते आमच्यासाठी महत्त्वाचे असून, विद्यार्थ्यांनो तुम्ही वयाने, अनुभवाने कितीही मोठे झालात तरी माझ्याबरोबरच सर्व शिक्षकांसाठी तुम्ही विद्यार्थी व आमच्या मुलांप्रमाणेच आहात, असे भावूक उद्गार प्राचार्य गंगाधर सरदेसाई यांनी काढले. 1975 सालच्या वर्गशिक्षकांनीही माजी विद्यार्थ्यांविषयी कौतुक व्यक्त केले.