रेस्टॉरंट मालकाच्या खूनप्रकरणी आरोपी उमेश, दया यांना जन्मठेप
पणजी: खास प्रतिनिधी
कांदोळी येथील रेस्टॉरंटचे मालक विश्वजित सिंग यांची ऑगस्ट 2018 मध्ये भोसकून हत्या केल्याप्रकरणी आरोपी उमेश लमाणी (रा. कांदोळी ), दया साहू (रा. मध्यप्रदेश) यांना म्हापसा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कळंगुट स्थानकाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी याप्रकरणाचा यशस्वी तपास केला होता.
केवळ मोटारसायकल चोरी झाल्याची तक्रार केल्याच्या रागाने हे खून प्रकरण झाले होते. 7 ऑगस्ट 2018 रोजी मयत विश्वजित सिंग यांनी आपली रॉयल एनफिल्ड बुलेट नेल्याबद्दल आणि परत न केल्याबद्दल त्यांचा एक कर्मचारी उमेश लमाणी याच्याविऊद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून नाराज होऊन आरोपी व्यक्तीने आणखी एक आरोपी दया शंकर साहू याच्या मदतीने सिंग यांच्याशी वाद करून त्यांच्या पोटात धारदार चाकू खुपसला आणि तलवारीने हल्ला केला होता. हा वाद सिंग यांच्या इमारतीच्या पार्किंग लॉट मध्ये मध्यरात्री झाला होता.
कळंगुटचे तत्कालीन पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दोन्ही आरोपींना कर्नाटकातून अटक केली होती आणि या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात आला होता. प्राणघातक शस्त्रs जप्त करणे, साक्षीदार आणि पुरावे यांची ओळख पटवणे आणि मौल्यवान सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केली होती. शेवटी त्याच वर्षी आरोपपत्र दाखल केले होते. खटल्यादरम्यान अनेकवेळा आरोपींचे जामीनअर्ज फेटाळण्यात आले. न्यायालयाने 42 साक्षीदार आणि डिजिटल पुरावे तपासले. सुमारे सहा वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर आणि सर्व साक्षीदार, सीसीटीव्ही आणि वैज्ञानिक पुरावे तपासल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी भादंसंच्या कलम 302 अन्वये खून केल्याबद्दल दोन्ही आरोपींना जन्मठेप आणि 50 हजार ऊपये दंड , तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम-5 (27) अंतर्गत गुह्यासाठी 3 वर्षे तुऊंगवासची शिक्षा ठोठावली आहे .
पोलीस तपास पथकात उपअधीक्षक जिवबा दळवी (तत्कालीन कळंगुट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक), उपनिरीक्षक सीताराम मलिक, उपनिरीक्षक महेश नाईक, सहाय्यक उपनिरीक्षक सुभाष मालवणकर आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या खटल्यात सरकारच्यावतीने सरकारी वकील अनुराधा तळावलीकर, वकील जेनिफर सांतामारिया आणि वकील रॉय डिसोझा यांनी युक्तिवाद केला.