पंधरा हजार वाहनचालकांचे परवाने रद्द करण्याची शिफारस
पणजी : वाहतूक नियमांचे उल्लंघन केले म्हणून 15,000 वाहनचालकांचे परवाने रद्द करण्याची शिफारस वाहतूक पोलिस विभागाने वाहतूक खात्याकडे केली आहे. चालू वर्षी 2023 मध्ये वाहतूक नियम मोडले म्हणून जानेवारी ते सप्टेंबर या 9 महिन्यांच्या कालावधीत सुमारे 15,000 वाहनचालकांची नोंद वाहतूक विभागाने केली आहे. त्यातील 1100 वाहनचालक हे मद्यपान करून वाहने चालवताना सापडल्याची नोंद आहे. अतिवेगाने आणि मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवले म्हणून 8700 जणांची नोंद झाली आहे. मोबाईलवर बोलताना व त्याचवेळी वाहन चालवताना सापडले म्हणून 2500 चालकांची नोंद वाहतूक विभागाने केली आहे. वाहतूक खाते आणि वाहतूक पोलिस एकमेकांच्या समन्वयाने काम करीत असून वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी सीसी टीव्ही कॅमेरा उपयुक्त ठरत असल्याचे समोर आले आहे. दोनापावला ते मिरामार, मिरामार ते बांदोडकर रोड व कॉटन ऑफ पोर्टस् पर्यंतच्या रस्त्यावर सिग्नलकडे लवकर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिस सूत्रांनी दिली आहे. मद्यपान करून वाहने चालवली म्हणून 1100 चालकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ऑगस्ट 2023 पर्यंत सुमारे 3000 वाहन परवाने निलंबित करण्यात आले होते. तशी शिफारस वाहतूक विभागाने वाहतूक खात्याकडे केली होती.