अमेरिकेत समलैंगिक विवाहाला मान्यता
अध्यक्ष बिडेन यांच्याकडून सेमसेक्स मॅरेज विधेयकावर स्वाक्षरी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी सेमसेक्स मॅरेज विधेयकाला कायद्याचे स्वरुप प्राप्त करून दिले आहे. या विधेयकावर बिडेन यांची स्वाक्षरी होताच अमेरिकेत आता समलैंगिक विवाहांना मान्यता मिळणार आहे. 2015 मध्ये तेथील सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकेतील समलैंगिक विवाहांवर बंदी घातली होती.
अमेरिकेच्या नागरिकांना या क्षणाची दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती. समानता आणि न्यायाच्या बाजूने असलेल्या आणि कधीच हार न मानलेल्या लोकांसाठी हा क्षण महत्त्वाचा आहे. डेमोक्रेट्स अन् रिपब्लिकन्स फारच कमी वेळा एकत्र येत निर्णय घेत असतात. सेम सेक्स मॅरेज बिल अशीच संधी देत असल्याचे बिडेन यांनी म्हटले आहे. प्रेम हे प्रेम असते, प्रत्येक व्यक्तीला प्रेम करण्याचा अधिकार आहे, विवाह करण्याचा आणि कुणासोबत करावा याचा निर्णय लोक स्वतःच घेऊ शकतात असे बिडेन यांनी नमूद केले आहे.
जून महिन्यात अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताच्या अधिकाराचे रक्षण करणारा निर्णय पालटविला होता. तेव्हापासून अमेरिकेतील लोकांमध्ये समलैंगिक विवाह धोक्यात येतील अशी भीती होती. याचमुळे बिडेन प्रशासनाने समलैंगिक विवाहांना मान्यता देणारे हे विधेयक सादर केले होते. जुलै महिन्यात हे विधेयक प्रतिनिधिगृहात मांडण्यात आले. 16 नोव्हेंबर रोजी ते वरिष्ठ सभागृह म्हणजेच सिनेटमध्ये पाठविण्यात आले, तेथे 30 नोव्हेंबर रोजी संमती मिळाल्यावर अध्यक्ष बिडेन यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आले होते. 14 डिसेंबर रोजी बिडेन यांनी या विधेयकाला स्वाक्षरी करत याला कायद्यात रुपांतरित केले आहे. 120 देशांमध्ये समलैंगिकतेला गुन्हा मानले जात नाही, तर केवळ 32 देशांमध्ये सद्यकाळात समलैंगिक विवाह करण्याची अनुमती आहे. याचाच अर्थ 88 देशांमध्ये समलैंगिकतेला अनुमती असली तरीही समलैंगिक विवाह करण्याची मुभा नाही. यात भारताचाही समावेश आहे. 2011 मध्ये नेदरलँड हा समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा पहिला देश ठरला होता.