For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बंड बांगलादेशात, संकट भारतात

06:32 AM Aug 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
बंड बांगलादेशात  संकट भारतात
Advertisement

बांगलादेशात झालेले बंड म्हणजे एक ‘झटका’ ऑपरेशन. शेख हसीना यांचे केवळ पंतप्रधानपद गेले एवढेच नव्हे तर त्यांना पळून जावे लागल्याने एक प्रकारे भारताचेच ‘हलाल’ ऑपरेशन  सुरु झाले आहे. नरेंद्र मोदी सरकारला गेल्या दशकात परराष्ट्र बाबीत मिळालेला हा सर्वात मोठा झटका होय. पंतप्रधान म्हणून राजीनामा देऊन शेख हसीना या भारतात धडकण्यापूर्वी काही तास अगोदरच नवी दिल्लीला या बंडाची माहिती मिळाली असे बोलले जात आहे. तेथील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ते शेजारी असून आपल्याला कळले नाही असे दावे होत आहेत. तेथील हिंदूंचे लोंढे भारताकडे यायला निघाले आहेत अशी वृत्ते धडकत आहेत. भारतीय मालावर बहिष्कार घाला अशी एक सुप्त चळवळ सुरु झाली आहे.

Advertisement

पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे हसीना यांचे सरकार कोसळले आणि भारताला एखाद्या बघ्याप्रमाणे आपल्या मित्र देशातील हा हाहाकार पाहणे भाग पडले. पन्नास वर्षापूर्वी पाकिस्तानचे दोन तुकडे पाडून ज्या देशाला आपण जन्म द्यायला मदत केली तो आता आपला फारसा मित्र राहणार नाही. उलट दुश्मन होऊ शकतो ही बाबच चिंता वाढवणारी आहे. पाकिस्तानच्या कुप्रसिद्ध आयएसआयने बांगलादेशातील विद्यार्थ्यांचा चळवळीचा फायदा उठवून घड्याळाचे काटे उलटे फिरवले आहेत. त्याला चीनची साथ मिळाली आहे. बांगलादेश कट्टर इस्लामी गटाच्या ताब्यात येत आहे असे दिसत आहे. आज उद्या बांगलादेश आणि पाकिस्तान यांचे गुळपीठ जमणार तेव्हा सारे शनी-मंगळ भारताच्या राशीत येणार आहेत.  ‘पाकिस्तान आमच्या रक्तात आहे आणि आम्हाला पाकिस्तानला जायचे आहे’ असे मोर्चे बांगलादेशात निघत आहेत. बंगबंधू शेख मुजिबूर रहमान यांचा देश अचानक गायब झाला आहे. हसीना यांच्या मुलाने असा दावा केला आहे की ज्यापद्धतीने देशात अराजक माजत आहे त्यातून त्याची वाटचाल ‘दुसऱ्या अफगाणिस्तान’ कडे सुरु झाली आहे. सगळेच भयावह आहे

Advertisement

एकीकडे स्वत:ला ‘विश्वगुरू’ म्हणवणारा भारत त्याच्या परसात काय चालले आहे याबद्दल एव्हढा अनभिज्ञ कसा बरे राहिला? असा प्रश्न साहजिकच जगातील प्रमुख राजधान्यांत विचारला जात आहे. त्याबाबत कोणतेच उत्तर नाही आहे. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा बांगलादेश भेटीला गेले

होते तेव्हा त्यांच्या विरोधात जी जोरदार निदर्शने झाली त्यात पोलीस गोळीबारात बारा जण अधिकृतपणे मारले गेले होते. शेख हसीनाविरुद्ध वातावरण

तापत होते हे दिसून येत होते. तेथील सैन्याने अचानक त्यांचा पाठिंबा काढून घेतल्याने हसीना यांना जीव वाचवून पळून यावे लागले.

ढाक्क्यामध्ये जे काही घडले ते केवळ भारतीय गुप्तहेर संस्थांचे मोठे अपयश आहेच पण त्याचबरोबर आपल्या परराष्ट्र धोरणाचे देखील. बांगलादेशच्या तीन बाजूना भारतीय सीमा आहेत आणि चौथ्या बाजूला हिंद महासागर. त्यामुळे

पाकिस्तानप्रमाणे बांगलादेशचा वापर करून चीन भारताला जेरीस आणू शकतो. अगोदरच चीन मोठ्या प्रमाणावर पुर्वोत्तरेकडील फुटीर चळवळींना खतपाणी घालत आहे. पाकिस्तानची शकले पाडून भारताने पन्नास वर्षापूर्वी केलेली नेत्रदीपक कामगिरी एकप्रकारे मातीला मिळाली आहे. पंधरा वर्षे हसीना पंतप्रधानपदी असताना भारताच्या अतिशय जवळच्या मित्र बनल्या होत्या. आपला असाच दुसरा घनिष्ठ मित्र भूतान होता पण दोन वर्षांपूर्वी भारताला अंधारात  ठेऊन भूतानने चीन बरोबर सीमा समझोता करून दणका दिला होता. त्यातून अजून आपण पुरते सावरलेले आहोत असे म्हणता येणार नाही. मालदीवमध्ये गेल्यावर्षी सत्ताबदल झाल्यावर तेथील चीनधार्जिण्या नव्या नेतृत्वाने तेथील भारतीय सुरक्षा दल हटवायची मागणी केली होती आणि तसे करणे भाग पाडले होते. नेपाळमधील भारताचे वजन केव्हाच कमी झालेले आहे.

इतर कोणत्या प्रगत राष्ट्रात असे काही घडले असते तर बऱ्याच जणांवर कारवाई झाली असती. भारतात अशा कारवाईबाबत कोणी ब्र देखील काढणार नाही. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे पंतप्रधान गृहमंत्र्यांच्या नंतर तिसऱ्या नंबरचे देशातील सर्वात वजनदार समजले जातात. भाजपमधील असंतुष्ट सुब्रमण्यम स्वामी यांनी बांगला देशामध्ये हिंदूंचा नरसंहार सुरु असताना भारत मूग गिळून का गप्प बसला आहे. त्याने आपली सेना बांगलादेशात का बरे घुसवली नाही? असा जलजळीत प्रश्न विचारत आहेत. या बंडामागे चीन, पाकिस्तान आणि अमेरिकेचा हात आहे अशावेळी मोदी मौनीबाबा का बनले आहेत आणि जणू काहीच झालेले नाही असे दाखवत आहेत असे स्वामी म्हणत आहेत.

परदेशी बाबीतील एक जाणकार वर्ग मात्र बांगला देशात जे काही घडले तो शेख हसीना यांच्या दडपशाहीचा परिणाम होय. गेली पंधरा वर्षे हसीना यांनी विरोधकांची मुस्कटदाबी केली आणि त्यांना तुरुंगात टाकले होते, त्याची फळे त्यांना भोगायला मिळाली आहेत असे सांगत आहेत. बांगलादेशातील हिंदू समाज अल्पसंख्यांक असल्याने स्वत:चे संरक्षण व्हावे म्हणून तो मोठ्या

प्रमाणावर हसीना यांना साथ देत होता. बदललेल्या परिस्थितीत त्याला मार सोसावा लागत आहे.

बांगलादेशातील घटनांवर पहिल्या प्रथम भाष्य करणाऱ्या एकमेव नेत्या म्हणजे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या होत. बांगलादेशातून कोणी लोक जर तेथील अत्याचाराला कंटाळून भारतात येत असतील तर त्यांना येऊ दिले पाहिजे असं जाहीर विधान करून आपण हिंदू हितेशी आहोत असे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्या मुस्लिमधार्जिण्या आहेत असे बंगालमधील त्यांचे विरोधक विशेषत: भाजप आरोप करत असताना दीदींनी एक वेगळीच खेळी करून त्यांना

निष्प्रभ केले. ज्यापद्धतीने घटना घडत आहेत त्याने एक गोष्ट स्पष्ट आहे. भारताने आता झापडे काढण्याची गरज आहे आणि बांगलादेशकडे आणि आपल्या अवतीभोवती बदलत असलेल्या परिस्थितीचे पुनर्मूल्यांकन करण्याची गरज आहे असे जाणकार सांगत आहेत. बांगलादेशमधील गंभीर घटनांवर जेव्हा सर्व पक्षांची बैठक घेण्यात आली तेव्हा पंतप्रधानांची अनुपस्थिती भल्याभल्यांना खटकली. नेहरूंच्या काळात अमेरिकेचे भारतात राजदूत राहिलेले प्रोफेसर जॉन केनेथ गालब्रेथ हे भारत म्हणजे ‘चालती बोलती बजबजपुरी’ (फंक्शनिंग अनार्की) आहे असे

म्हणायचे. त्यात 21 व्या शतकातदेखील फरक पडलेला नाही असे आता वाटू

लागले नसते तर नवल नाही.

वक्फ विधेयकावर सरकार तोंडघशी

बांगलादेशात बंड होवो अथवा इतरत्र काहीही घडो, आपल्याकरीता काहीच

बदललले नाही असे भासवणाऱ्या पंतप्रधानांना गेल्या आठवड्यात एक आगळाच धडा मिळाला. लोकसभेतील निकालानंतर हिंदुत्वाची मतपेढी परत घट्ट करण्याचा एक प्रयत्न म्हणून वक्फ विधेयक लोकसभेत आणण्यात आले.

पहिल्यासारखे ‘आपण म्हणू ते पूर्व’ समजून हे विधेयक प्रथम एका संसदीय समितीकडे पाठवण्याच्या विरोधकांच्या मागणीकडे सरकारने पहिल्याप्रथम दुर्लक्ष केले. पण

चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देशम आणि चिराग पासवान यांच्या लोकजन शक्ती पक्षाने विरोधकांची मागणी उचलून धरली तेव्हा सरकारचा नाईलाज झाला. मित्रपक्षांशी सल्लामसलत न करता हे विधेयक आणल्याने सरकार अक्षरश: तोंडघशी पडले. मोदी सरकार हे रालोआ सरकार झाल्यापासून संसदेत सरकारला

मिळालेला हा पहिला मोठा झटका होय.

विमा आणि मेडिक्लेम पॉलिसी वरील जीएसटी काढून टाकण्याच्या विरोधकांच्या मागणीला चंद्राबाबू नायडू तसेच जनसेना या दुसऱ्या मित्र पक्षाने उचलून धरून सरकारला असेच अडचणीत आणले आहे. सध्या पंतप्रधानाचे आणि भाजपचे ग्रह उच्चीचे दिसत नाहीत. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे सितारे बुलंद दिसत नाहीत. कुस्तीमध्ये विनेश फोगटचे ज्याप्रकारे सुवर्ण पदक हुकले त्याने सारा देश हळहळला. नीरज चोप्राचे देखिल सुवर्णपदक गेले. जणू भरवशाच्या म्हशीला टोणगा झाला.

खेळाच्या क्षेत्रातदेखील देशाची अचानक दुर्दशा बघायला मिळत आहे. 1960च्या रोममध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर प्रथमच भारताला कमी पदके मिळणार आहेत असे जाणकार म्हणत आहेत.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :

.