यथोचित सन्मान
शिल्पकलेतील अतुलनीय योगदानासाठी ज्येष्ठ पत्रकार राम सुतार यांची ‘महाराष्ट्रभूषण पुरस्कार 2024’ साठी झालेली निवड हा यथोचित सन्मानच म्हटला पाहिजे. महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून महाराष्ट्र भूषण ओळखला जातो. हा पुरस्कार राम सुतार यांना जाहीर झाल्याने एका व्रतस्थ शिल्पकाराबरोबरच शिल्पकलेचाही गौरव झाला आहे, असे म्हटल्यास ते अधिक संयुक्तिक ठरेल. राम सुतार यांचा जीवनप्रवास तसा थक्क करणाराच म्हणावा लागेल. फेब्रुवारी 1925 रोजी महाराष्ट्रातील धुळ्यामधील गोंदूर या छोट्याशा गावी एका गरीब कुटुंबात जन्मलेले राम सुतार हे अगदी वयाच्या शंभरीतही शिल्पकलेमध्ये स्वत:ला वाहून घेतात, यावरूनच त्यांची या कलेबद्दलची आस्था, प्रेम आणि निष्ठा दिसून येते. मुंबईच्या ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’मध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. 1952 ते 58 या काळात तिशीतील राम सुतार यांनी आधी अजिंठा-वेऊळ येथील शिल्पांच्या डागडुजीचे आणि नंतर पंचवार्षिक योजनांचे लाभ सांगणारी लघुशिल्पे बनविण्याचे काम सरकारी नोकरीत राहून केले. राम सुतार यांनी 1960 पासून त्यांचा स्वतंत्र स्टुडिओ उभारला आणि त्यांच्या कामाची व्याप्ती वाढतच गेली. आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, इंदिरा गांधी, राजीव गांधी अशा अनेक दिग्गज नेत्यांच्या शिल्पांची निर्मिती त्यांनी केली आहे. जिवंतपणा हे त्यांच्या शिल्पकलेचे वैशिष्ट्या होय. आपल्या जादुई हाताची ही किमया त्यांच्या अनेक शिल्पांमध्ये दिसून येते. मन ओतून आणि सर्वस्व पणाला लावून त्यांनी शिल्पे कशी घडवली, याची प्रचितीच हे सगळे पाहिल्यावर येते. संसद भवनाच्या आवारातील मौलाना आझाद, इंदिरा गांधी, राजीव गांधी, गोविंदवल्लभ पंत आणि जगजीवनराम अशा अनेक मूर्ती घडवताना त्यांनी जी सफाई दाखवली, त्यालाही तोड नाही. 10 ते 18 फुटाचे शिल्प असो किंवा त्याहून मोठे शिल्प असो. ते घडवताना कोणत्या बाबींची दक्षता घेतली पाहिजे, हे सुतार यांची कला सांगते. आज फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, रशिया, इंग्लंड या ठिकाणीदेखील त्यांनी साकारलेली शिल्पे उभी आहेत. नेत्यांच्या जीवनातील प्रसंगांचे दर्शन घडविणारी भित्तिशिल्पे हेही सुतार यांचे एक वैशिष्ट्या म्हणता येईल. गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा पुतळा हा तर त्यांच्या आयुष्यातील मैलाचा दगड म्हणता येईल. जगातील सर्वांत उंच पुतळा म्हणून या पुतळ्याकडे पाहिले जाते. गुजरातसह देशातीलच नव्हे, तर जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या पुतळ्याकरिता त्यांनी जे कष्ट उपसले, त्याला तोड नाही. शिल्पकला ही केवळ एक कला नसून, ऐतिहासिक दस्तऐवजच आहे. राम सुतार यांच्यासारख्या महान शिल्पकाराने आपल्या कलेच्या माध्यमातून भारताच्या या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला अमरत्व बहाल केले आहे. राम सुतार यांनीं आपल्या शिल्पकलेतून महाराष्ट्राचा आणि देशाचा गौरव वाढविला आहे. त्यांच्या कलाकृती जगभरात भारताचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळेच महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी त्यांची सर्वानुमते निवड करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी मांडलेली ही भावना सार्वत्रिकच म्हणायला हवी. अरबी समुद्रातील शिवस्मारक, इंदू मिलचे प्रस्तावित आंबेडकर स्मारक यांसह अनेक स्मारके सुतार यांच्याच कल्पनेतूनच साकारत आहेत. ही स्मारकेदेखील महाराष्ट्रासह संपूर्ण देशाकरिता एक अभिमानास्पद ठेवा ठरतील, यात कोणताही संदेह वाटत नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांना केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून देण्यात येणारा 2016 या वर्षासाठीचा टागोर पुरस्कार जाहीर झाला. याशिवाय 1999 मध्ये पद्मश्री, तर 2016 मध्ये पद्भभूषण पुरस्काराने राम सुतार यांना गौरविण्यात आले. आता महाराष्ट्र भूषण पुरस्कारामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. पुरस्कारानंतर हा महाराष्ट्रभूषण नव्हे, तर हिंदुस्थान भूषण पुरस्कार असल्याच्या भावना राम सुतार यांनी व्यक्त केल्या आहेत. यातूनच त्यांच्या मनातील या पुरस्काराचे स्थान काय, याची प्रचिती येते. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारला जावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. हा शिवपुतळा उभारण्याची संधी आपल्याला मिळाली, तर आनंदच होईल, अशा भावनाही ते व्यक्त करतात. शिवनेरी हे शिवजन्मस्थळ असल्याने शिवप्रेमींची पावले तेथे वळत असतात. शिवजयंतीच्या दिवशी तर शिवनेरी किल्ल्यावर प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळे शिवजन्मस्थळी शिवरायांचा भव्यदिव्य पुतळा उभारला जाण्याची राम सुतार यांची मागणी योग्यच. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आचारविचारातून समाजापुढे नवा आदर्श उभा केला. रयतेचे राज्य काय असते, हे महाराजांनी दाखवून दिले. त्यामुळे शिवरायांचा भव्य पुतळा शिवनेरीवर दिमाखात उभा राहिला, तर महाराष्ट्रवासियांसह संपूर्ण देशवासियांना तो प्रेरणा देत राहील, यात कोणताही संदेह वाटत नाही. खरे तर शिल्पकला ही अत्यंत सुंदर आणि अवघड कला आहे. एखादा पुतळा वा शिल्प घडवताना कलाकाराला त्याच्याशी समरस व्हावे लागते. तन, मन, धन अर्पून केवळ संबंधित शिल्पाचाच विचार करावा लागतो. राम सुतार यांच्याबाबत बोलायचे झाल्यास या पलीकडे जाऊन त्यांनी शिल्पे घडवली आहेत. आज ते शंभर वर्षांचे आहेत. या वयातही त्यांच्या मनातील पुतळा घडविण्याची वा साकारण्याची ऊर्मी यत्किंचितही कमी झालेली नाही. उलट ती वाढत असल्याचेच दिसून येते. खरा कलाकार कसा असतो आणि त्याची कला किती आत्मिक असते, याचेच हे लक्षण होय. म्हणूनच ‘महाराष्ट्रभूषण पुरस्कारा’च्या यादीत एका महनीय शिल्पकाराची भर पडली, याबद्दल राम सुतार यांचे हार्दिक अभिनंदन.