स्वत:च्या सामर्थ्याची जाणीव करून द्या
झारखंडमध्ये योगी आदित्यनाथ गर्जले : जेव्हा विभागलो, तेव्हा कापलो गेलो
वृत्तसंस्था/ कोडरमा
झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी प्रचारसभा घेत हेमंत सोरेन सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सोरेन सरकारमधील मंत्री आलमगीर आलमच्या निकटवर्तीयाच्या घरातून मोठी रक्कम हस्तगत झाल्याने त्यांची तुलना ‘औरंगजेबा’सोबत केली आहे. ज्याप्रकारे औरंगजेबाने देशाला लुटले होते, त्याचप्रकारे आलमगीरने राज्याच्या गरीबांना लुटले आहे असे म्हणत योगींनी पुन्हा एकदा ‘बटेंगे तो कटेंगे’ या स्वत:च्या नाऱ्याचा पुनरुच्चार केला आहे.
औरंगजेबाने देशाला लुटले होते, मंदिरांना नष्ट केले होते, त्याचप्रकारे झारखंड मुक्ती मोर्चाचा एक मंत्री आलमगीर आलम याने झारखंडमधील गरीबांना लुटले आहे. मंत्र्यासोबत त्याचे नोकर, नातेवाईकांच्या घरातून मोठी रोकड हस्तगत झाली आहे. हा सर्व झारखंडच्या जनतेचा पैसा होता, लूटण्याचे हे प्रमाण अन्य कुठेच दिसून आले नव्हते अशी टीका योगींनी केली आहे. आलमगीर आलमच्या निवासस्थानावर ईडीने टाकलेल्या धाडीत 30 कोटी रुपयांची रोकड हस्तगत केली होती.
एकजूट रहा
स्वत:च्या सामर्थ्याची जाणीव करून द्या, जातींमध्ये विभागले जाऊ नका, जातीच्या नावावर लोक तुम्हाला विभागतील. काँग्रेस आणि विरोधी पक्ष हेच काम करतात. हे लोक बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांना बोलावत आहेत. एक दिवस तुम्हाला हे लोक घरातील घंटा आणि शंखही वाजवू देणार नाहीत. याचमुळे एकजूट रहा. देशाचा इतिहास साक्षीदार आहे, की जेव्हा कधी आम्ही विभागलो आहोत, तेव्हा निर्घृणपणे कापले गेलो आहोत असे योगींनी उपस्थित समुदायाला संबोधित करताना म्हटले आहे.
2017 नंतर उत्तरप्रदेशात बुलडोझर चालण्यास सुरुवात झाली, त्यानंतर काही जण तुरुंगात आहेत. तर काही जणांचा ‘राम नाम सत्य’ झाला आहे. उत्तरप्रदेशातू माफियांचे उच्चाटन झाल्याचा दावा योगींनी केला आहे.