दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेडिमेड किल्ले-मावळे खरेदीसाठी दाखल
बेळगाव : दीपावलीच्या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागातील मुले किल्ला बनवण्यासाठी धावपळ करत आहेत. दिवाळी जवळ आली की मुले किल्ले बनवण्यासाठी मग्न होतात. पण वाढत्या शहरीकरणामुळे तसेच किल्ला बनवण्यासाठी माती मिळवणे मुलांना अवघड होत आहे. बाजारपेठेत विविध आकाराचे किल्ले व मावळे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. दिवाळी हा सण मुलांसाठी एक पर्वणीच असते. तसेच हा सण सर्वांसाठी आनंददायी असतो. दिवाळीत आकाश कंदिल, पणत्या लावणे, रांगोळी काढणे, किल्ले बनवणे, भेटवस्तुंची देवाणघेवाण होत असते.
प्रत्येक कुटुंबामध्ये दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी धडपड सुरू असते. या काळात मुले कुटुंबासमवेत दिवाळीचा आनंद साजरा करतात. हा सण अंधारावर प्रकाशाचे प्रतिक म्हणून ओळखला जातो. दिवाळी आली की मुलांच्या उत्साहाला उधाण येते. या काळात मुले विविध किल्ले बनविण्याच्या कामात गुंतलेली असतात. यासाठी त्यांना वडिलधाऱ्यांचाही पाठिंबा मिळत असतो. मात्र, काही ठिकाणी वाढत्या शहरीकरणामुळे माती उपलब्ध होत नसल्याने रेडिमेड किल्ले, मावळे खरेदीकडे मुलांचा ओढा वाढला आहे. स्मार्टफोनच्या जमान्यात मुले मोबाईल गेम्सकडे अधिक रमत असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळते.
आता अपुरी जागा व किल्ला बनवण्यासाठी माती उपलब्ध होत नसल्याने विक्रीसाठी आलेल्या रेडिमेड किल्ल्यांमुळे काही प्रमाणात मुलांचा उत्साह कमी झाला आहे. बाजारपेठेत विविध आकाराचे रेडिमेड किल्ले, मावळे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. रेडिमेड किल्ल्यांची 200 ते 500 रुपयांपर्यंत विक्री केली जात आहे. 5 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत रेडिमेड मावळ्यांची विक्री होत आहे. पूर्वी दिवाळीत घरोघरी मातीचे किल्ले बनविले जात असत. लहान मुले उत्साहाने व आनंदाने किल्ला बनवत असत. पण आता किल्ला बनवण्यासाठी लाल माती मिळत नसल्याने व जागेचा अभाव यामुळे रेडिमेड किल्ले व मावळे खरेदीला मागणी वाढली आहे.