एनसीडीएफआयला आवश्यक मदत करण्यास तत्पर
केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे आश्वासन : गुजरातमध्ये एनसीडीएफआयच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
बेळगाव : सहकार क्षेत्रात विजेप्रमाणे चपखलपणे कार्य असलेल्या राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एनसीडीएफआय) च्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यास सिद्ध आहोत. आतापर्यंत वार्षिक 7 हजार कोटींचा व्यवहार करीत आलेली ही संस्था सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी आहे. पुढील दिवसांत संस्थेने आणखी प्रगती साधण्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक ती मदत मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी दिले. गुजरात राज्यातील आनंदनगर येथे सुमारे 300 कोटी रुपये खर्चातून उभारलेल्या एनसीडीएफआयच्या सुसज्जीत नूतन इमारतीचे उद्घाटन केंद्रीय मंत्री शाह यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. देशातील सर्व सहकारी संघांना एनसीडीएफआय हे किरिटासारखे आहे.
सहकार संघांच्या आर्थिक आणि तांत्रिक विकासात एनसीडीएफआय प्रमुख भूमिका बजावत आहे. देशात दूध उत्पादकांच्या मालकी व नियंत्रणाखाली असलेल्या संस्थांना बाजारपेठ मिळवून देण्यात असो शेतकरी सहकारी संस्थांना बळकटी देण्यात असो एनसीडीएफआय नेहमीच प्रयत्नशील असते. त्याचबरोबर सहकार तत्त्वे वृद्धिंगत करण्यासाठी महत्त्वाचे कार्य निभावत असल्याचे त्यांनी सांगितले. याचवेळी मंत्री शाह यांनी इमारतीच्या आवारातील रोपट्याला पाणी घालून वनमहोत्सवाला चालना दिली. राष्ट्रीय सहकारी विकास निगमचे चेअरमन डॉ. मीनेश शाह, व्यवस्थापकीय मंडळाचे संचालक व बेमूलचे अध्यक्ष तसेच अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी, मंगलजीत रॉय, शामलभाई पटेल, व्यंकटराव नाडगौड, के. एस. मणी, नरिंदीरसिंग शेर्गील, एस. रघुराम, समीरकुमार फरिदा, व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास सज्जा यांच्यासह सहकार क्षेत्रातील प्रमुख यावेळी उपस्थित होते.