वाचनाने कैद्यांची होत लवकरच सुटका
बोलिवियाच्या तुरुंगांमध्ये नवा प्रयोग
बोलिवियाच्या तुरुंगांमध्ये सध्या एक नवा प्रयोग केला जात आहे. तेथे अधिक पुस्तके वाचणाऱया कैद्याची शिक्षा संपण्यापूर्वी मुक्तता होत आहे. पुस्तके वाचल्याने कैद्यांमध्येही बदल घडून येतोय. हा प्रयोग अलिकडेच ब्राझीलच्या तुरुंगांमध्येही दिसून आला आहे. अमेरिकेच्या सर्व तुरुंगांमध्ये कैद्यांसाठी चांगले वाचनालय असते. अनेकदा तुरुंगात कैदी पुस्तके वाचतात आणि काही जण पुस्तके लिहितात देखील.
बोलिवियाच्या 45 तुरुंगांमधील 865 कैद्यांना सध्या पुस्तकांच्या वाचनासाठी प्रोत्साहित केले जात आहे. या कार्यक्रमाचे नाव बुक्स बिहाइंड बार्स असून यात कैद्यांसाठी प्रत्येक तुरुंगात वाचनालय तयार करण्यात आले असून तेथून कादंबऱयांपासून विज्ञान आणि इतिहासापर्यंतची पुस्तके घेऊन वाचू शकतात.
बोलिवियाच्या तुरुंगांमध्ये सध्या अशाप्रकारे कैद्यांच्या हातांमध्ये पुस्तके दिसून येत आहेत. प्रत्येक पुस्तकानंतर कैद्याची एक परीक्षा होते आणि मग त्याचा लाभ लवकर सुटकेच्या स्वरुपात मिळतो. काही कैदी जलदपणे पुस्तके वाचणारे देखील आहेत. परंतु सर्वसाधारणपणे येथील तुरुंगांमधील कैदी फारसे शिक्षित नाहीत. याचमुळे त्यांच्यासाठी पुस्तकाचे वाचन हे अधिक वेळ घेणारे काम आहे.
बोलिवियाचा शेजारी देश ब्राझीलमध्ये अशाच एका जेल प्रोग्राममधून शिकवण घेत स्वतःच्या देशातील तुरुंगांमध्ये हा प्रयोग सुरू केला. यामुळे तुरुंगातील कैद्यांना स्वतःच्या बुद्धीला चालना देण्याची संधी मिळत आहे. तुरुंगात गरजेपेक्षा अधिक असलेल्या कैद्यांना कमी करण्याच्या प्रयत्नांतर्गत बोलिवियात हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. बोलिवियात कुठल्याही कैद्याला आजन्म कारावास किंवा मृत्युदंड ठोठावला जात नाही.
तुरुंगांमधील वाचनालयाचा इतिहास फार जुना नाही. अमेरिकेत पहिल्यांदा 1790 मध्ये तुरुंगात वाचनालय सुरू करण्यात आले होते. आता तेथील सर्व राज्य आणि संघीय तुरुंगामंध्ये वाचनालय अनिवार्य आहे. पूर्वी कैद्यांना केवळ धार्मिक पुस्तकेच वाचण्यासाठी दिली जात होती. परंतु आता सर्वप्रकारची पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत.