केंद्राच्या योजना ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवा
भाजप ग्रामीण कार्यकर्ता मेळाव्यात प्रतिपादन
बेळगाव : जिल्हा व तालुका पंचायतीच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आतापासूनच तयारीला लागावे. तसेच केंद्र सरकारच्या योजना ग्रामीण भागातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवाव्यात, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी केले. सोमवारी धर्मनाथ भवन येथील भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण जिल्हा कार्यालयात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी गुळेदगुड मतदारसंघाचे माजी आमदार राजशेखर शिलवंतरा यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. अधिकाधिक महिला कार्यकर्त्यांना भाजपा पक्ष संघटनेशी जोडावे, असे आवाहन महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस डॉ. सोनाली सरनोबत यांनी केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस संदीप देशपांडे, युवराज जाधव, के. व्ही. पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.