अमेरिकेत पुन्हा गोळीबार, 4 ठार
ओक्लाहोमामध्ये रुग्णालयात घटना : हल्लेखोरही मारला गेला
वृत्तसंस्था /टुल्सा
अमेरिकेच्या ओक्लाहोमा प्रांतात बुधवारी गोळीबाराची घटना घडली आहे. तेथील टुल्सा शहराच्या सेंट फ्रान्सिस रुग्णालयात झालेल्या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार केले जात आहेत.
हल्लेखोरासह एकूण 5 जणांच्या मृत्यूची पुष्टी मिळाली आहे. हल्लेखोराला स्वतःच्याच बंदुकीची गोळी लागली होती. हल्लेखोराची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. हल्लेखोराने गोळीबारासाठी बंदूक आणि रायफलचा वापर केला होता. घटनेनंतर सेंट फ्रान्सिस रुग्णालयातील एक इमारत बंद करण्यात आली असल्याची माहिती टुल्साचे पोलीस उपप्रमुख जोनाथन ब्रूक्स यांनी दिली आहे.
गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच 3 मिनिटांमध्ये पोलीस तेथे पोहोचले होते. घटनेदरम्यान तेथे उपस्थित असलेल्या लोकांची चौकशी केली जात असल्याचे ब्रूक्स यांनी सांगितले आहे. टुल्सा येथील गोळीबाराची माहिती अध्यक्ष जो बिडेन यांना देण्यात आली असल्याचे व्हाइट हाउसच्या अधिकाऱयांकडून सांगण्यात आले.
अमेरिकेत गोळीबाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. मंगळवारी न्यू ऑरलिन्समध्ये एका हायस्कुलमधील समारंभात गोळीबार झाला होता, यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू तर 2 जण जखमी झाले होते. यापूर्वी टेक्सास प्रांतातील एका शाळेत झालेल्या गोळीबारात 19 विद्यार्थ्यांसह 2 शिक्षकांना जीव गमवावा लागला होता.