तलाठी भरती परीक्षेदिवशीच आरसीयूचा पेपर
विद्यार्थ्यांमधून नाराजी : वेळापत्रकात बदलाची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
तलाठी भरती परीक्षेदिवशीच राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या चौथ्या सेमिस्टरच्या परीक्षा होणार आहेत. एकाच दिवशी दोन महत्त्वाच्या परीक्षा आल्याने विद्यार्थी गोंधळात पडले आहेत. त्यामुळे विद्यापीठाने त्या दिवशी असलेल्या ऐच्छिक कन्नड या विषयाचा पेपर पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
व्हिलेज अकौंटंट (तलाठी) भरतीसाठी 27 व 29 रोजी राज्यभर परीक्षा होणार आहे. तलाठी म्हणून काम करण्याची मोठी संधी विद्यार्थ्यांना आहे. रविवार 29 रोजी तलाठी भरतीसाठीची भाषा विषयाची परीक्षा सकाळच्या सत्रात होणार आहे. त्याच दिवशी दुपारी आरसीयूने ऐच्छिक कन्नड विषयाचा पेपर ठेवला आहे. आरसीयूअंतर्गत बेळगाव, बागलकोट व विजापूर येथील 421 हून अधिक कॉलेज आहेत. ऐच्छिक कन्नड विषयाच्या परीक्षेसाठी 25 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
विद्यार्थ्यांनी 750 रुपये भरून तलाठी भरतीसाठी परीक्षा अर्ज दाखल केला आहे. स्पर्धा परीक्षेतून थेट नोकरीची संधी उपलब्ध असल्याने अर्ज करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सकाळी 10.30 ते दु 12 या वेळेत परीक्षा होणार आहे. परंतु त्याच दिवशी दुपारी 2 वाजता ऐच्छिक कन्नड विषयाचीही परीक्षा होणार आहे. त्यामुळे आरसीयूने विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे.