पदवी प्रवेशासाठी आरसीयूकडून मुदतवाढ
विद्यार्थ्यांना 15 जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुभा : रजिस्ट्रार संतोष कामगौडा यांची पत्रक काढून मुदतवाढीची घोषणा
बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठाने पदवी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ दिली आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या, तिसऱ्या व पाचव्या सत्राला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आता 15 जुलैपर्यंत प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना दंडासहित प्रवेश शुल्क भरावे लागणार असल्याचा इशारा विद्यापीठाने दिला आहे. पदवी प्रवेशासाठी आरसीयूने 7 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कॉलेजमधून प्रवेश घेताना तांत्रिक अडचणी येत होत्या. प्रवेशासाठी असलेल्या यूयूसीएमएस या पोर्टलवर अर्ज दाखल करताना विलंब होत होता. त्यामुळे सोमवारी दिवसभरात विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय झाली. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी रात्री आरसीयूचे रजिस्ट्रार संतोष कामगौडा यांनी पत्रक काढून मुदतवाढ दिल्याचे जाहीर केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना 15 जुलैपूर्वी पदवी प्रवेशासाठी अर्ज करावा लागणार आहे. आठवडाभराची मुदतवाढ मिळाली असल्याने बेळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
पदवी अभ्यासक्रमाला 14 पासून प्रारंभ
प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली असली तरी, पदवी अभ्यासक्रमाला सोमवार दि. 14 जुलैपासून प्रारंभ होणार आहे. आरसीयूने जाहीर केलेल्या शैक्षणिक वेळापत्रकानुसार अभ्यासक्रमाला सुरुवात होईल. त्यानंतर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागणार आहे.