आरसीबीचा विजयारंभ
आयपीएल 18 : केकेआरचा घरच्या मैदानावर पराभव : विराट कोहली, फिल सॉल्टची शानदार अर्धशतके, रहाणेची खेळी वाया
वृत्तसंस्था/ कोलकाता
इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेची सुरुवात रजत पाटीदारच्या नेतृत्वात आरसीबीने दणक्यात केली. शनिवारी ईडन गार्डन स्टेडियमवर झालेल्या सलामीच्या सामन्यात आरसीबीने केकेआरचा 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यात केकेआरने आरसीबीसमोर 175 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे विजयी लक्ष्य आरसीबीने 16.2 षटकांतच पूर्ण करत शानदार विजय मिळवला. विराट कोहली व फिल सॉल्ट यांची अर्धशतकी खेळी व कृणाल पंड्याने तीन विकेट्स घेत आरसीबीच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
केकेआरने विजयासाठी दिलेल्या 175 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीला फिल सॉल्ट व विराट कोहलीने आक्रमक सुरुवात करुन दिली. या जोडीने केकेआरच्या गोलंदाजांची तुफानी धुलाई करताना 9 षटकांतच 90 धावा केल्या होत्या. सॉल्टने 31 चेंडूत 9 चौकार व 2 षटकारासह 56 धावांची शानदार खेळी साकारली. अर्धशतकानंतर मात्र तो फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर बाद झाला.
विराटची नाबाद अर्धशतकी खेळी
सॉल्ट बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेला देवदत्त पडिक्कल स्वस्तात बाद झाला. यानंतर कर्णधार रजत पाटीदारने विराटला चांगली साथ दिली. विराटने शानदार अर्धशतकी खेळी साकारताना 36 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारासह नाबाद 59 धावांची खेळी साकारली. रजत पाटीदारने 16 चेंडूत 34 धावांचे योगदान दिले. आरसीबी विजयाच्या उंबरठ्यावर असताना पाटीदार बाद झाला. यानंतर विराटने लिव्हिंगस्टोनच्या साथीने संघाला 16.2 षटकांतच विजय मिळवून दिला. लिव्हिंगस्टोनने नाबाद 15 धावा केल्या. या दमदार विजयासह आरसीबीने गुणतालिकेत आपले खातेही उघडले आहे.
केकेआरचा घरच्या मैदानावर पराभव
कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटकात हा निर्णय योग्य ठरला. सलामीवीर क्विंटन डी कॉक (4) पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर रहाणे आणि नरेन यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने वादळी फलंदाजी करत संघाला चांगली धावसंख्या उभारुन दिली. रहाणेने अवघ्या 25 चेंडूत अर्धशतकी खेळी साकारताना आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई केली. याशिवाय, नरेनसोबत शतकी भागीदारी रचली. त्याने 31 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांसह 56 धावांची खेळी केली. तर सुनील नरेनने 26 चेंडूत चौकार आणि 3 षटकारांसह 44 धावांचे योगदान दिले. ही जोडी लागोपाठ बाद झाल्यानंतर केकेआरचा संघ कोसळला.
23.75 कोटींचा वेंकटेश अय्यर 6 धावा करत क्लीन बोल्ड झाला. तर रिंकू सिंग आणि आंद्रे रसेलही फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाले. अंगीकृष रघुवंशीने 22 चेंडूत 30 धावांचे योगदान दिले. यामुळे केकेआरला 20 षटकांत 8 बाद 174 धावापर्यंत मजल मारता आली. आरसीबीकडून कृणाल पंड्याने 3 तर हेजलवूडने 2 गडी बाद केले. यश दयाल, रसिक सलाम आणि सुयश शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक
केकेआर 20 षटकांत 8 बाद 174 (सुनील नरेन 44, अजिंक्य रहाणे 56, रघुवंशी 30, रिंकू सिंग 12, कृणाल पंड्या 3 तर हेजलवूड 2 बळी)
आरसीबी 16.2 षटकांत 3 बाद 177 (फिल सॉल्ट 56, विराट कोहली नाबाद 59, रजत पाटीदार 34, लिव्हिंगस्टोन नाबाद 15, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन व वैभव अरोरा प्रत्येकी एक बळी).
विराटचा 400 वा टी 20 सामना
विराट कोहलीचा हा 400 वा टी 20 सामना होता. आपल्या 400 व्या टी 20 सामन्यात अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून देणारा विराट कोहली हा जगभरातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. कारण विराटने फक्त अर्धशतक झळकावले नाही, तर तो संघाला विजय मिळेपर्यंत मैदानात होता.