आरसीबीची विजयी सलामी
गुजरात टायटन्सवर 6 गडी राखून मात : रिचा घोषची तुफानी फटकेबाजी
वृत्तसंस्था/ वडोदरा
महिला प्रीमियर लीगच्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाने गुजरात टायटन्सचा 6 गडी राखून धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 5 बाद 201 धावा केल्या. यानंतर आरसीबीने 18.3 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत शानदार विजय मिळवला. रिचा घोषने अवघ्या 27 चेंडूत नाबाद 64 धावांची खेळी करत आरसीबीच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
वडोदार येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात बेथ मुनी (42 चेंडूत 56) व अॅश्ले गार्डनर (37 चेंडूत नाबाद 79) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर गुजरातने 5 बाद 201 धावांचा डोंगर उभा केला. याशिवाय डॉटिनने 25 धावांचे योगदान दिले. गुजरातने विजयासाठी दिलेले 202 धावांचे लक्ष्य आरसीबीने 18.3 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. एलिस पेरीने अर्धशतकी खेळी साकारताना 57 धावांची खेळी साकारली. रिचा घोषने आक्रमक खेळताना 27 चेंडूत नाबाद 64 धावा फटकावल्या. याशिवाय, कनिका आहुजाने नाबाद 30 धावांचे योगदान दिले. यामुळे आरसीबीने विजयी लक्ष्य अगदी सहजरित्या पार करता आले.