For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरसीबीचा ‘विराट’ विजय

06:05 AM Apr 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
आरसीबीचा ‘विराट’ विजय
Advertisement

आयपीएल 18 : राजस्थानवर 11 धावांनी मात : सामनावीर हेजलवूडचे 4 बळी : विराट-पडिक्कलची शानदार अर्धशतके

Advertisement

वृत्तसंस्था/बेंगळूर

चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने राजस्थान रॉयल्सवर 11 धावांनी विजय मिळवला. विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर आरसीबीने 205 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वालने 19 चेंडूंत 49 धावांची दमदार खेळी साकारली. पण तो बाद झाला आणि राजस्थानचा संघ अडचणीत आला. आरसीबीने या सामन्यात राजस्थानवर 11 धावांनी दमदार विजय साकारला. विशेष म्हणजे, यंदाच्या हंगामात आरसीबीने घरच्या मैदानात दमदार विजय साकारला.

Advertisement

नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीला विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी भन्नाट सुरुवात करून दिली. राजस्थानच्या जोफ्रा आर्चरने भेदक सुरुवात केली होती. त्यामुळे कोहली आणि सॉल्ट यांनी सावधपणे गोलंदाजी खेळून काढली. पण त्यानंतर मात्र या दोघांनी दमदार फटकेबाजी केली. पॉवर प्लेमध्ये त्यांनी एकही विकेट गमावली नाही. या दोघांनी मिळून 61 धावांची सलामी दिली. पॉवर प्लेनंतर सॉल्ट बाद झाला आणि ही जोडी फुटली. सॉल्ट 26 धावा करुन माघारी परतला.

विराट-पडिक्कलची अर्धशतके

सॉल्ट बाद झाला तरी विराट मात्र धडाकेबाज फटकेबाजी करत राहिला. विराटने अर्धशतक पूर्ण केले. त्याने शानदार खेळी साकारताना 42 चेंडूत 8 चौकार व 2 षटकारासह 70 धावांची खेळी साकारली. पडिक्कलनेही 27 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारासह 50 धावांचे योगदान दिले. हे दोघेही एकामागोमाग एक बाद झाले. पण त्यानंतर टीम डेव्हिड आणि जितेश शर्मा यांनी अखेरच्या षटकात दमदार फटकेबाजी करत संघाला दोनशे धावांचा पल्ला गाठून दिला. डेव्हिडने 15 चेंडूत 23 तर जितेश शर्माने 10 चेंडूत नाबाद 20 धावा फटकावल्या. राजस्थानकडून संदीप शर्माने दोन गडी बाद केले.

राजस्थानचा निसटता पराभव

आरसीबीच्या 206 धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल यांनी दमदार सुरुवात केली. जैस्वालने आपल्या आक्रमक शैलीने फलंदाजी करताना 19 चेंडूत 7 चौकार व 3 षटकारासह 49 धावा चोपल्या. वैभव 12 धावा करुन माघारी परतला. हे दोघेही बाद झाल्यानंतर रियान पराग व नितीश राणा यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण हे दोघेही बाद झाल्यानंतर राजस्थानच्या इतर फलंदाजांनी निराशा केली. परागने 10 चेंडूत 22 तर नितीश राणाने 28 धावा फटकावल्या. यानंतर ध्रुव जुरेल मैदानात असेपर्यंत राजस्थानला विजयाच्या आशा होत्या. जुरेलनेही 47 धावांचे योगदान दिले पण तो बाद झाला अन् राजस्थानच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. शेवटच्या दोन षटकात तळाच्या फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे राजस्थानला 9 गडी गमावत 194 धावापर्यंत मजल मारता आली. आरसीबीकडून हेजलवूडने सर्वाधिक 4 गडी बाद करत विज्ंायात मोलाचे योगदान दिले.

विराटने ख्रिस गेलला टाकले मागे

विराट कोहली टी 20 मध्ये 50 पेक्षा जास्त धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज बनला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. टी 20 मध्ये 50 पेक्षा जास्त धावा करण्याच्या बाबतीत त्याने वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला मागे टाकले आहे. ख्रिस गेलने 110 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या. विराटने 111 वेळा 50 हून धावा केल्या आहेत. या बाबतीत अव्वल स्थानावर ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आहे, ज्याने 117 वेळा अर्धशतक झळकावले आहे.

संक्षिप्त धावफलक

आरसीबी 20 षटकांत 5 बाद 205 (फिल सॉल्ट 26, विराट कोहली 42 चेंडूत 8 चौकार व 2 षटकारासह 70, देवदत्त पडिक्कल 27 चेंडूत 50, टीम डेव्हिड 23, रजत पाटीदार 1, जितेश शर्मा नाबाद 20, संदीप शर्मा 2 बळी, आर्चर व हसरंगा प्रत्येकी एक बळी)

राजस्थान रॉयल्स 20 षटकांत 9 बाद 194 (यशस्वी जैस्वाल 49, वैभव सुर्यवंशी 16, नितिश राणा 28, रियान पराग 22, ध्रुव जुरेल 47, हेटमायर 11, शुभम दुबे 12, हेजलवूड 4 बळी, कृणाल पंड्या 2 बळी, भुवनेश्वर व यश दयाल प्रत्येकी एक बळी).

Advertisement
Tags :

.