राजस्थानसमोर आज ‘आरसीबी’चे कठीण आव्हान
आयपीएल’चा आज ‘एलिमिनेटर’ सामना, पराभूत होणारा संघ स्पर्धेतून होणार बाद
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सला आज बुधवारी कठोर परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. कारण येथे होणार असलेल्या करो किंवा मरो धर्तीच्या ‘आयपीएल एलिमिनेटर’मध्ये त्यांचा सामना फॉर्ममध्ये असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरशी होणार आहे. स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात धक्कादायक घसरण वाट्याला आल्यानंतर आता पुन्हा उसळी घेण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
साखळी फेरीत एका टप्प्यावर रॉयल्स अव्वल स्थान मिळविणार असे वाटत होते. मात्र चार पराभव आणि ‘केकेआर’विऊद्धचा शेवटचा सामना पावसात वाहून गेल्याने संजू सॅमसनची टीम सनरायझर्स हैदराबादच्या मागे तिसऱ्या स्थानावर पोहोचली. दुसरीकडे, आरसीबीने स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावरून सनसनाटी पद्धतीने पुनरागमन केलेले आहे. या मोसमातील पहिल्या आठ सामन्यांपैकी सात गमावल्यानंतर फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील संघाने स्वप्नवत वाटचाल केली आणि अखेरीस गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला नमवून प्लेऑफमध्ये स्थान मिळवले.
एकीकडे राजस्थान रॉयल्स चार पराभव आणि पावसाचा सामना करून, तर दुसऱ्या बाजूने आरसीबी सलग सहा विजय मिळवून या सामन्यात उतरत आहे. 2008 चे विजेते असलेले राजस्थान रॉयल्स काही आठवड्यांपूर्वी विजेतेपदाचे भक्कम दावेदार मानले जात होते. मात्र अचानक अंडरडॉग्ज म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. फॉर्मात असताना राजस्थान रॉयल्सने आपल्यला पराभूत करणे किती कठीण आहे ते दाखवून दिलेले आहे. परंतु शेवटच्या चार सामन्यांनी त्यांच्या फलंदाजी आणि गोलंदाजीमधील कमतरता उघड केल्या आहेत.
जोस बटलर बाहेर पडल्याने त्यांच्या फलंदाजीला बरीच ताकद गमवावी लागली आहे आणि घसरण थांबवण्याच्या दृष्टीने यशस्वी जैस्वाल (348 धावा), कर्णधार सॅमसन (504 धावा) आणि रियान पराग (531 धावा) यांच्यावर बरेच काही अवलंबून असेल. सॅमसन आणि पराग यांनी पुन्हा एकदा दमदार कामगिरी करून संघाला सावरावे अशी अपेक्षा केली जाईल. इंग्लंडचा टॉम कोहलर-कॅडमोर जैस्वालसोबत सलामीला येण्याची एक्षा आहे. मात्र फॉर्म आणि अनुभवाचा विचार करता ही जोडी दमदार दिसत नाही.
शिमरॉन हेटमायर या सामन्यासाठी उपलब्ध राहील अशी अपेक्षा असेल. त्याच्यामुळे राजस्थानच्या शेपटाला मजबुती मिळेल. संघाची तळाकडची फळी या मोसमात फलंदाजीत मोठे योगदान देऊ शकलेली नाही. या एलिमिनेटरचे ठिकाण इतर मैदानांसारखे फलंदाजीचे नंदनवन नाही. इतर मैदानांवर जवळ असलेल्या सीमारेषा आणि पाटा खेळपट्ट्या यांनी गोलंदाजांचे काम महाकठीण बनवून टाकलेले आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर या मोसमातील 12 डावांत 200 धावांचा टप्पा केवळ दोनदाच पार केला गेला आहे, याचा अर्थ शिस्तबद्ध मारा आणि भक्कम फलंदाजी असलेला संघ येथे जिंकण्याची शक्यता जास्त आहे.
दुसरीकडे, आरसीबीचा विराट कोहली या मोसमात 14 सामन्यांतून 708 धावांसह सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे आणि तो सारा फरक घडवून शकतो. सुऊवातीच्या संघर्षानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने कोहलीसह सलामीला वर्चस्व गाजविणाऱ्या भागीदाऱ्या करताना फॉर्म मिळविलेला आहे, तर रजत पाटीदारने या मोसमात पाच अर्धशतकांची नोंद करताना वरच्या फळीला मजबुती दिली आहे. इंग्लंडचा विल जॅक्स बाहेर पडल्याने आरसीबीवर फारसा परिणाम झालेला नाही, कारण अनुभवी दिनेश कार्तिक तळाकडे 195 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने फटकेबाजी करत आहे. त्यांच्या मागील सामन्यात डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालने शानदार अंतिम षटक काढून ‘सीएसके’ला विजयापासून वंचित केले आणि ‘आरसीबी’ला प्लेऑफमध्ये पोहोचविले. दयालने यंदा आपली क्षमता सिद्ध करून दाखविलेली आहे.
संघ : राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), आबिद मुश्ताक, आवेश खान, ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा, कुलदीप सेन, कुणालसिंह राठोड, नांद्रे बर्गर, नवदीप सैनी, रविचंद्रन अश्विन, रियान पराग, संदीप शर्मा, शिमरोन हेटमायर, शुभम दुबे, रोव्हमन पॉवेल, टॉम कोहलर-कॅडमोर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जैस्वाल, युजवेंद्र चहल, तनुष कोटियन.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार वैशाख, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरून ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग आणि सौरव चौहान.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.