For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरसीबीचा घरच्या मैदानावर पहिला विजय

06:58 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
आरसीबीचा घरच्या मैदानावर पहिला विजय
Advertisement

सामनावीर कोहली, दिनेश कार्तिक, लोमरोर यांची फटकेबाजी, पंजाबचा 4 गड्यांनी पराभव

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सोमवारी येथे खेळविण्यात आलेल्या सहाव्या सामन्यात विराट कोहली आणि दिनेश कार्तिक यांच्या समयोचित फटकेबाजीच्या जोरावर आरसीबीने किंग्ज इलेव्हन पंजाबचा 4 चेंडू बाकी ठेवून 4 गड्यांनी पराभव केला. या स्पर्धेतील आरसीबीचा हा पहिला विजय आहे. धवनच्या नेतृत्वाखालील किंग्ज इलेव्हन पंजाबने आरसीबीला विजयासाठी 177 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर आरसीबीने 19.2 षटकात 6 बाद 178 धावा जमवित विजय नेंदविला. आरसीबीच्या डावाला कोहली आणि कर्णधार डू प्लेसीस यानी दमदार सुरूवात करून दिली. या जोडीने पहिल्या गड्यासाठी 16 चेंडूत 26 धावांची भागीदारी केली. त्यामध्ये डु प्लेसीसचा वाटा केवळ 3 धावांचा राहिला. रबाडाने डु प्लेसीसला झेलबाद केले. त्यानंतर रबाडाने आरसीबीला आणखी एक धक्का देताना ग्रीनला 3 धावावर बाद केले. रजत पाटीदारने कोहलीला बऱ्यापैकी साथ दिली. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 43 धावांची भर घातली. फिरकी गोलंदाज ब्रारने पाटीदारचा त्रिफळा उडविला. त्याने 18 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 18 धावा जमविल्या. ब्रारने मॅक्सवेलचा 3 धावावर त्रिफळा उडविल्याने आरसीबीवर अधिक दडपण आले. आक्रमक फटकेबाजी करणारा कोहली हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर षटकार खेचण्याच्या नादात सीमारेषेजवळील ब्रारकरवी झेलबाद झाला. कोहलीने 49 चेंडूत 2 षटकार आणि 11 चौकारांसह 77 धावा जमविल्या. सॅम करनने रावतला पायचित केले. त्याने 14 चेंडूत 1 चौकारासह 11 धावा जमविल्या. दिनेश कार्तिक आणि लोमरोर यांच्यावर खुपच जबाबदारी होती. दरम्यान कार्तिकने 10 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 28, तर लोमरोरने 8 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह नाबाद 17 धावा जमवित आपल्या संघाला 4 चेंडू बाकी ठेवून शानदार विजय मिळवून दिला. डावातील शेवटचे षटक टाकण्यासाठी अर्शदिप सिंगकडे चेंडू सोपविला. दिनेश कार्तिकने या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार तर त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विजयी चौकार ठोकला. आरसीबीच्या डावात 6 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. आरसीबीला अवांतराच्या रूपात 18 धावा मिळाल्या.

Advertisement

आरसीबीने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 50 धावा जमविताना 2 गडी गमविले. आरसीबीचे अर्धशतक 36 चेंडूत तर शतक 72 चेंडूत आणि दिडशतक 106 चेंडूत फलकावर लागले. कोहलीने 31 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकारासह अर्धशतक झळकविले. या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने प्रभसिमरन सिंगच्या जागी अर्शदिप सिंगला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानात आणले. पंजाब संघातर्फे रबाडा आणि ब्रार यांनी प्रत्येकी 2, तर सॅम करन आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला.

तत्पूर्वी या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजी दिली. कर्णधर शिखर धवनच्या समयोचित फलंदाजीमुळे पंजाब संघाने 20 षटकात 6 बाद 176 धावा जमविल्या. कर्णधार धवनने 37 चेंडूत 1 षटकार, 5 चौकारांसह 45 धावा जमविल्या. प्रभसिमरन सिंगने 17 चेंडूत 2 षटकार, 2 चौकारांसह 25 धावा जमविल्या. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 55 धावांची भागीदारी केली. दरम्यान डावातील तिसऱ्या षटकात आरसीबीच्या मोहम्मद सिराजने बेयरस्टोला कोहलीकरवी झेलबाद केले. त्याने 2 चौकारांसह 8 धावा जमविल्या. मॅक्सवेलने प्रभसिमरन सिंगला झेलबाद केले. आरसीबीच्या जोसेफने लिव्हींगस्टोनला रावतकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 13 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 17 धावा जमविल्या. डावातील 13 व्या षटकात मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात धवन कोहलीकरवी झेलबाद झाला. सॅम करन आणि जितेश शर्मा याने संघाच्या धावसंख्येला आकार देताना पाचव्या गड्यासाठी 52 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. सॅम करनने 17 चेंडूत 3 चौकारासह 23, तर जितेश शर्माने 20 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 27 धावा जमविल्या. शशांक सिंगने 8 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 21 धावा जमविल्या. ब्रार 2 धावावर नाबाद राहिला. पंजाबच्या डावामध्ये 8 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. पंजाब संघाला अवांतराच्या रूपात 8 धावा मिळाल्या. पंजाब संघाने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकात 40 धावा जमविताना 1 गडी गमविला. पंजाब संघाचे अर्धशतक 42 चेंडूत तर शतक 75 चेंडूत आणि दीड शतक 106 चेंडूत फलकावर लागले. आरसीबीतर्फे मोहम्मद सिराज आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 2 तर जोसेफ आणि दयाल यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला.

संक्षिप्त धावफलक : किंग्ज इलेव्हन पंजाब 20 षटकात 6 बाद 176 (शिखर धवन 45, बेअरस्टो 8, प्रभसिमरन सिंग 25, लिव्हींगस्टोन 17, सॅम करन 23, जितेश शर्मा 27, शशांक सिंग नाबाद 21, ब्रार नाबाद 2, अवांतर 8, मोहम्मद सिराज 2-26, मॅक्सवेल 2-29, दयाल 1-23, जोसेफ 1-43),

आरसीबी 19.2 षटकात 6 बाद 178 (विराट कोहली 77, ग्रीन 3, पाटीदार 18, मॅक्सवेल 3, रावत 11, दिनेश कार्तिक नाबाद 28, लोमरोर नाबाद 17, अवांतर 18, रबाडा 2-23, ब्रार 2-13, सॅम करन 1-30, हर्षल पटेल 1-45).

Advertisement
Tags :

.