48 तासात आरसीबीचा पलटवार
पंजाबचा घरच्या मैदानावर उडवला धुव्वा : आरसीबी 7 विकेट्सनी विजयी
वृत्तसंस्था/ मुल्लनपूर
चेस मास्टर विराट कोहली व देवदत्त पडिक्कल यांच्या शानदार खेळीच्या जोरावर आरसीबीने पंजाबचा त्यांच्या घरच्या मैदानावर 7 विकेट्सनी पराभव केला. रविवारी झालेल्या सामन्यात पंजाबने 20 षटकांत 6 गडी गमावत 157 धावा केल्या. यानंतर आरसीबीने विजयी लक्ष्य 18.5 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यातच पूर्ण केले. विशेष म्हणजे, 18 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात पंजाबने आरसीबीला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभवाचा धक्का दिला होता. यानंतर आरसीबीने अवघ्या 48 तासांतच पंजाबला त्यांच्या घरच्या मैदानात नमवत पराभवाचा बदला घेतला आहे.
रविवारी झालेल्या सामन्यात पंजाबने आरसीबीसमोर विजयासाठी 158 धावांचे लक्ष्य दिले होते. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात फिल सॉल्ट फक्त 1 धाव करून बाद झाला. पण त्यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी 103 धावांची भागीदारी करत आरसीबीच्या विजयाचा पाया रचला. पडिक्कलने 35 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह 61 धावा केल्या. हरप्रीत ब्रारने त्याला बाद करत आरसीबीला दुसरा धक्का दिला. यानंतर कर्णधार रजत पाटीदार जास्त काळ क्रीजवर राहू शकला नाही आणि 12 धावा करून बाद झाला. दुसरीकडे, चेस मास्टर विराट कोहलीने मात्र 54 चेंडूत 7 चौकार व 1 षटकारासह नाबाद 73 धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विराटने संयमी व शानदार खेळी साकारली. जितेश शर्मा 11 धावांवर नाबाद राहिला. पंजाबकडून अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार व चहलने प्रत्येकी एक गडी बाद केला.
पंजाबला पराभवाचा धक्का
प्रारंभी, आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. पंजाबच्या फलंदाजांना कमी धावसंख्येपर्यंत रोखण्यात आरसीबीच्या गोलंदाजांना यश आले. पंजाबने 20 षटकांत 6 गडी गमावून फक्त 157 धावा केल्या. पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक 33 धावा केल्या. त्याच वेळी, शशांक सिंगने 31 धावांची नाबाद खेळी करत संघाला या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. जोश इंग्लिशनेही 29 धावा केल्या आणि मार्को जॅन्सन 25 धावांवर नाबाद राहिला. घरच्या मैदानावर खेळताना पंजाबच्या खेळाडूंना अपेक्षित अशी कामगिरी करता आली नाही, परिणामी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबीकडून कृणाल पंड्या व सुयश शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. सध्या गुणतालिकेत आरसीबीचा संघ 10 गुणासह तिसऱ्या तर पंजाबचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे.
विराटचा आणखी विक्रमनामा
पंजाबविरुद्ध लढतीत विराटने नाबाद 73 धावांची खेळी साकारत आरसीबीच्या विजयात मोलाचे योगदान दिले. दरम्यान, यंदाच्या हंगामातील त्याचे हे चौथे अर्धशतक ठरले. विराट आता इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात सर्वाधिक अर्धशतके करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने या बाबतीत डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले आहे. पंजाब विरुद्ध आरसीबी सामन्यापूर्वी, विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नर यांनी 66 अर्धशतके केली होती. या सामन्यात विराटने अर्धशतकी खेळी साकारत हा विक्रम आपल्या नावे केला आहे.
संक्षिप्त धावफलक
पंजाब किंग्स 20 षटकांत 6 बाद 157 (प्रियांश आर्या 22, प्रभसिमरन सिंग 33, जोस इंग्लिश 29, शशांक सिंग नाबाद 31, यान्सेन नाबाद 25, कृणाल पंड्या व सुयश शर्मा प्रत्येकी दोन बळी) आरसीबी 18.5 षटकांत 3 बाद 159 (विराट कोहली 54 चेंडूत नाबाद 73, फिल सॉल्ट 1, देवदत्त पडिक्कल 35 चेंडूत 61, रजत पाटीदार 12, जितेश शर्मा नाबाद 11, चहल, अर्शदीप सिंग व हरप्रीत ब्रार प्रत्येकी एक बळी).
