आरसीबीचा दिल्लीला ‘दे धक्का’
घरच्या मैदानावर दिल्लीचा पराभव : गुणतालिकेत आरसीबीची अव्वलस्थानी झेप : दिल्लीची चौथ्या स्थानी घसरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कृणाल पंड्या आणि विराट कोहली या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने दिल्ली कॅपिट्ल्सचा त्यांच्याच घरच्या मैदानात 6 विकेट्सने धुव्वा उडवला. दिल्लीने आरसीबीला विजयासाठी 163 धावांचे आव्हान दिले होते. आरसीबीने हे आव्हान 4 विकेट्स गमावून पूर्ण केले. आरसीबीने यासह दिल्लीचा हिशोबही क्लिअर केला आणि पराभवाची परतफेड केली. दिल्लीने आरसीबीला 24 मार्च रोजी 6 विकेट्सने पराभूत केले होते. आता आरसीबीने दिल्लीला जशास तसं उत्तर दिलं. आरसीबीचा हा या मोसमातील घराबाहेरील आणि एकूण सातवा विजय ठरला. तर दिल्लीचा हा तिसरा पराभव ठरला.
आरसीबीचा संघ दिल्लीच्या 163 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला खरा. पण आरसीबीची 3 बाद 26 अशी बिकट अवस्था झाली होती. त्यानंतर कृणाल पंड्या फलंदाजीला आला आणि त्याने विराट कोहलीला सोबतीला घेत विजयाचा पाया रचला. कृणाल चौथ्या स्थानावर आला, पण विराटपूर्वी त्याने अर्धशतक पूर्ण केले. विराटने संथ फलंदाजी करताना आपले अर्धशतक पूर्ण केले आणि पीचवर त्याने जास्त वेळ घालवण्याचे काम चोख बजावले. विराटने 51 तर कृणाल पंड्याने नाबाद 73 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. टीम डेव्हिड 19 धावांवर नाबाद राहिला. आरसीबीने विजयी लक्ष्य 18.3 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यातच पार केले.
दिल्लीचा संघ घरच्या मैदानात प्रथम फलंदाजी करायला उतरला खरा पण त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. अभिषेक पोरेल व करुण नायर स्वस्तात बाद झाल्याने त्यांची 2 बाद 44 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर संघात परतलेला फॅफ ड्यु प्लेसिस हा 22 धावांवर बाद झाला, दिल्लीसाठी हा तिसरा धक्का होता. पण त्यानंतर केएल राहुलने तीन चौकारांच्या जोरावर 41 धावांची खेळी साकारली. स्टब्जने 34 धावांचे योगदान दिले. त्यानंतरच्या फलंदाजांनी उपयुक्त खेळी साकारल्या आणि त्यामुळेच दिल्लीच्या संघाला त्यांच्याच घरात 162 धावा करता आल्या.
संक्षिप्त धावफलक
दिल्ली कॅपिट्ल्स 20 षटकांत 8 बाद 162 (केएल राहुल 41, स्टब्ज 34, पोरेल 28, डु प्लेसिस 22, भुवनेश्वर कुमार 3 तर हेजलवूड 2 बळी)
आरसीबी 18.3 षटकांत 4 बाद 165 (विराट कोहली 51, कृणाल पंड्या नाबाद 73, डेव्हिड नाबाद 19, अक्षर पटेल 2 बळी).