For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पिंक सिटीत आरसीबीची हवा

06:56 AM Apr 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
पिंक सिटीत आरसीबीची हवा
Advertisement

सामनावीर फिल सॉल्ट-विराट कोहलीची मॅचविनींग खेळी : राजस्थानचा 9 गड्यांनी पराभव

Advertisement

वृत्तसंस्था/ जयपूर

येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने राजस्थानचा 9 विकेट्सनी धुव्वा उडवला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 173 धावा 4 विकेट्स गमावून केल्या. याउलट आरसीबीने 175 धावा 1 विकेट गमावत हा सामना सहज जिंकला. आरसीबीच्या विजयात विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी मोठे योगदान दिले, दोघांनीही दमदार अर्धशतकी खेळी खेळली. विशेष म्हणजे, या विजयासह आरसीबीने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. आरसीबीने 6 पैकी 4 सामन्यात विजय मिळवत 8 गुणांसह तिसरे स्थान मिळवले.  दुसरीकडे राजस्थान रॉयल्स 6 पैकी 4 सामन्यात पराभूत झाल्याने त्यांची 7 व्या स्थानावर घसरण झाली आहे.

Advertisement

174 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी आरसीबीला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये 92 धावांची शानदार सलामी भागीदारी झाली. सॉल्टने फक्त 33 चेंडूत 65 धावांची तुफानी खेळी केली, यादरम्यान त्याने 5 चौकार आणि 6 षटकार मारले. दरम्यान, सॉल्टला कुमार कार्तिकेयने बाद करत राजस्थानला पहिले यश मिळवून दिले.

विराटची नाबाद अर्धशतकी खेळी

फिल सॉल्ट बाद झाल्यानंतर, विराट कोहलीने देवदत्त पडिकलसोबत 83 धावांची भागीदारी करून आरसीबीचा विजय निश्चित केला. विराट कोहलीने 45 चेंडूत 62 धावांची नाबाद खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 2 षटकार मारले. पडिक्कलने 28 चेंडूत 5 चौकार व 1 षटकारासह 40 धावांचे योगदान दिले. विराट व पडिक्कल जोडीने आरसीबीला 17.3 षटकांतच विजय मिळवून दिला. राजस्थानकडून कुमार कार्तिकेयने एकमेव बळी घेतला.

होमग्राऊंडवरच राजस्थानच्या पदरी निराशा

प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानला कर्णधार संजू सॅमसन व यशस्वी जैस्वाल यांनी शानदार सुरुवात करुन देताना 49 धावांची सलामी दिली. ही जोडी जमलेली असताना सॅमसन 15 धावांवर कृणाल पंड्याच्या गोलंदजीवर बाद झाला. सॅमसन अपयशी ठरल्यानंतर जैस्वालने रियान परागसोबत 56 धावांची भागीदारी करत संघाचा डाव पुढे नेला. परागने 22 चेंडूत 30 धावांचे योगदान दिले तर जैस्वालने शानदार अर्धशतकी खेळी साकारताना 47 चेंडूत 10 चौकार व 2 षटकारासह 75 धावांची सर्वोच्च खेळी साकारली. ही जोडी बाद झाल्यानंतर ध्रुव जुरेलने 23 चेंडूत नाबाद 35 धावा करत संघाला 173 धावापर्यंत मजल मारुन दिली. आरसीबीकडून भुवनेश्वर, यश दयाल, हेजलवूड व कृणाल पंड्याने प्रत्येकी एक गडी बाद केला. अर्थात, होम ग्राऊंडवर राजस्थानसाठी ही धावसंख्या कमी ठरली. आरसीबीने विजयी लक्ष्य सहज पार करत राजस्थानला दारुण पराभवाचा धक्का दिला.

संक्षिप्त धावफलक

राजस्थान रॉयल्स 20 षटकांत 20 षटकांत 4 बाद 173 (यशस्वी जैस्वाल 75, संजू सॅमसन 15, रियान पराग 30, ध्रुव जुरेल नाबाद 35, हेटमायर 9, नितीश राणा नाबाद 4, जोस हेजलवूड, भुवनेश्वर कुमार, यश दयाल व कृणाल पंड्या प्रत्येकी एक बळी)

आरसीबी 17.3 षटकांत 1 बाद 175 (फिल सॉल्ट 33 चेंडूत 65, विराट कोहली 45 चेंडूत नाबाद 62, पडिक्कल 28 चेंडूत नाबाद 40, कुमार कार्तिकेय 1 बळी).

विराट कोहलीचे अनोखे शतक

रविवारी राजस्थानविरुद्ध लढतीत विराटने नाबाद 62 धावांची खेळी साकारत आरसीबीच्या विजयात मोलाचे योगदान दिले. दरम्यान, या अर्धशतकी खेळीसह टी 20 क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम नोंदवला आहे. विराटचे हे टी 20 क्रिकेटमधील 100 वे अर्धशतक ठरले. यासह टी 20 क्रिकेटच्या इतिहासात 100 अर्धशतके पूर्ण करणारा तो जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर 109 अर्धशतकासह पहिल्या स्थानावर आहे. वॉर्नरनंतर विराटचा दुसरा क्रमांक लागतो.

Advertisement
Tags :

.