आरसीबीने पटकावले पहिले आयपीएल जेतेपद
18 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात, पंजाब किंग्सवर 6 धावांनी विजय, शशांकची एकाकी लढत
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आणि विराट कोहली यांनी 18 वर्षांच्या वेदना व निराशेचे स्वप्न धुवून काढत मंगळवारी रात्री आयपीएल स्पर्धेचे पहिल्यांदाच जेतेपद पटकावले. अंतिम लढतीत त्यांनी पंजाब किंग्सवर केवळ 6 धावांनी रोमांचक विजय मिळवित स्वप्तपूर्ती केली.
आयपीएल 18 व्या आवृत्तीच्या अंतिम लढतीत पंजाब किंग्सने आरसीबीला निर्धारित 20 षटकांत 9 बाद 190 धावांवर रोखले होते. त्यानंतर पंजाबला 20 षटकांत 7 बाद 184 धावांवर रोखत विजय साकार केला.
पंजाबला 191 धावांचे आव्हान गाठण्यासाठी संघर्ष करावा लागला. कर्णधार श्रेयस अय्यर, जोश इंग्लिस शशांक सिंग, नेहल वढेरा हे फॉर्मात असलेले फलंदाज मोठ्या खेळी करू शकले नाहीत. फक्त शशांक सिंगने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. शेवटच्या षटकात पंजाबला विजयासाठी 29 धावांची गरज होती. शशांकने हेझलवुडचा पहिला फुलटॉस चेंडू त्याने वाया घालविला. नंतर दुसऱ्या चेंडूवरही धाव होऊ शकली नाही. नंतरच्या चार चेंडूवर त्याने 6, 4, 6, 6 अशा 22 धावा तडकावल्या. पण त्याचे हे प्रयत्न अपुरे पडल्याने पंजाबला जेतेपदापासून वंचित रहावे लागले. शशांकने केवळ 30 चेंडूत 3 चौकार, 6 षटकारांसह नाबाद 61 धावा फटकावल्या. आरसीबीच्या कृणाल पंड्या व यश दयाल यांनी किफायशीर गोलंदाजी केली. कृणालने 4 षटकांत 17 धावा देत 2 तर दयालने 18 धावा देत 1 बळी मिळविला. भुवनेश्वरने 38 धावांत 3 बळी मिळविले तर शेफर्डला एका बळीसाठी 30 धावा मोजाव्या लागल्या.
कोहलीची अँकरची भूमिका
पंजाबकडून प्रथम फलंदाजी मिळाल्यावर फलंदाजीस अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर चौथ्यांदा अंतिम फेरी गाठणाऱ्या आरसीबीला दडपणामुळे मोकळेपणाने फलंदाजी करता आली नाही. त्यांच्या प्रत्येक फलंदाजाने चांगली सुरुवात केली. मात्र त्याचे मोठ्या खेळीत त्यांना रूपांतर करता आले नाही. मोठ्या खेळीची अपेक्षा असणाऱ्या विराट कोहलीने अँकरची भूमिका बजावण्यावर भर दिला. त्याने 35 चेंडू 43 धावा काढल्या. यात केवळ 3 चौकारांचा समावेश. त्यातील दोन चौकार त्याने नवव्या षटकानंतर नोंदवले. पॉवरप्लेमध्ये आरसीबीने 1 बाद 55 धावा जमविल्यानंतर त्यांच्या धावांचा ओघ मंदावला होता. 6 ते 11 व्या षटकापर्यंत त्यांना 42 धावा जमविता आल्या. फिल सॉल्ट 16 धावा काढून बाद झाला. त्यानंतर मयांक अगरवाल 24, रजत पाटीदार 26 व लियाम लिव्हिंगस्टोन 25 धावा काढून बाद झाला. पंजाबचा काईल जेमीसन प्रभावी गोलंदाज ठरला. त्याने 3 बळी मिळविले तर अखेरच्या षटकांत अर्शदीप सिंगने 3 बळी टिपले. अखेरच्या टप्प्यात जितेश शर्माने 10 चेंडूत 24 धावा फटकावल्या तर लिव्हिंगस्टोनने 15 चेंडूत 25 धावा काढल्या.
आरसीबीने दिलेले उद्दिष्ट पुरेसे नाही, असेच सर्वांना वाटत होते. पण त्यांच्या भेदक माऱ्यापुढे आणि दडपणामुळे पंजाबचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले आणि आरसीबीला 18 व्या मोसमात पहिले जेतेपद पटकावण्यात यश मिळाले कर्णधार श्रेयस अय्यरवर पंजाबचा भरवसा होता. पण तो केवळ एक धाव काढून बाद झाला आणि त्यांच्या आशेवर पाणी पडले.
संक्षिप्त धावफलक : आरसीबी 20 षटकांत 9 बाद 190 : फिल सॉल्ट 9 चेंडूत 16, कोहली 35 चेंडूत 43, मयांक अगरवाल 18 चेंडूत 24, रजत पाटीदार 16 चेंडूत 26, लिव्हिंगस्टोन 15 चेंडूत 25, जितेश शर्मा 10 चेंडूत 24, शेफर्ड 9 चेंडूत 17, कृणाल पंड्या 4, अवांतर 9. अर्शदीप सिंग 3-40, जेमीसन 3-48, ओमरझाइ 1-35, विजयकुमार वैशाक 1-30, चहल 1-37.
पंजाब किंग्स : 20 षटकांत 7 बाद 184 : प्रियांश आर्य 19 चेंडूत 24, प्रभसिमरन सिंग 22 चेंडूत 26, जोश इंग्लिस 23 चेंडूत 39, अय्यर 1, नेहल वढेरा 18 चेंडूत 15, शशांक सिंग 30 चेंडूत नाबाद 61, स्टोइनिस 2 चेंडूत 6, ओमरझाइ 1, अवांतर 11. भुवनेश्वर 2-38, कृणाल पंड्या 2-17, शेफर्ड 1-30, हेझलवुड 1-54, यश दयाल 1-18.