आरसीबीचा 11 धावांनी विजय
मुंबई इंडियन्स पराभूत, दिल्ली कॅपिटल्स थेट अंतिम फेरीत
वृत्तसंस्था / मुंबई
महिलांच्या टी-20 प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेतील मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या चुरशीच्या सामन्यात आरसीबीने मुंबई इंडियन्सवर 11 धावांनी विजय मिळविला. मुंबई इंडियन्सच्या या सामन्यातील पराभवामुळे दिल्ली कॅपिटल्सने थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. आता गुजरात आणि मुंबई यांच्यात एलीमनेटरचा सामना होणार असून या सामन्यातील विजयी संघाबरोबर दिल्लीची जेतेपदासाठी लढत होईल.
स्पर्धेच्या गुणतक्त्यात दिल्ली कॅपिटल्सने 8 सामन्यांतून 10 गुण घेत पहिले, मुंबई इंडियन्सने 8 सामन्यातून 10 गुण घेत दुसरे, गुजरात टायटन्सने 8 सामन्यातून 8 गुणांसह तिसरे, आरसीबीने 8 सामन्यातून 6 गुणांसह चौथे तर युपी वॉरियर्सने 8 सामन्यांतून 6 गुणांसह पाचवे आणि शेवटचे स्थान मिळविले. दिल्ली आणि मुंबई यांनी समान 10 गुण घेतले असले तरी दिल्लीने 0.396 तर मुंबईने 0.192 अशी धाव सरासरी राखली आहे.
मंगळवारच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजी दिली. आरसीबीने 20 षटकात 3 बाद 199 धावा जमवित मुंबई इंडियन्सला विजयसाठी 200 धावांचे आव्हान दिले. मुंबई इंडियन्सने 20 षटकात 9 बाद 188 धावा जमविल्या.
आरसीबीच्या डावात स्मृती मानधनाने 31 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह 53, इलेसीपेरीने 38 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 49, रिचा घोषने 22 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 36, मेघनाने 13 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 26 तर वेरहॅमने 1 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 31 धावा झोडपल्या. आरसीबीच्या डावात 7 षटकार आणि 25 चौकार नोंदविले गेले. मुंबई इंडियन्सतर्फे मॅथ्युजने 2 तर केरने 1 गडी बाद केला. आरसीबीने पॉवरप्ले दरम्यान पहिल्या 6 षटकात 53 धावा जमविताना 1 गडी गमविला. आरसीबीचे अर्धशतक 33 चेंडूत, शतक 70 चेंडूत, दीड शतक 103 चेंडूत नोंदविले गेले. मानधनाने अर्धशतक 3 षटकार आणि 6 चौकाराच्या मदतीने झळकविले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबई इंडियन्सच्या डावात नॅट सिव्हेर ब्रंटने एकाकी लढत देत 35 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह 69 धावा जमविल्या. सजनाने 12 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 23, कर्णधार कौरने 2 चौकारांसह 20, मॅथ्युजने 4 चौकारांसह 19 धावा केल्या. आरसीबीतर्फे स्नेह राणाने 3, गॅरेथ आणि पेरी यांनी प्रत्येकी 2 तसेच ग्रॅहम आणि वेरहॅम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मुंबई इंडियन्सने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 45 धावा जमविताना 2 गडी गमविले. त्यांचे अर्धशतक 39 चेंडूत, शतक 77 चेंडूत तर दीड शतक 104 चेंडूत नोंदविले गेले. ब्रंटने 29 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. मुंबई इंडियन्सच्या डावात 4 षटकार आणि 22 चौकार नोंदविले गेले.
संक्षिप्त धावफलक: आरसीबी 20 षटकात 3 बाद 199 (पेरी नाबाद 49, मानधना 53, मेघना 26, घोष 36, वेरहॅम नाबाद 31, मॅथ्युज 2-37, केर 1-47), मुंबई इंडियन्स 20 षटकात 9 बाद 188 (नॅट सिव्हेर ब्रंट 69, सजना 23, हरमनप्रित कौर 20, मॅथ्युज 19, स्नेह राणा 3-26, गॅरेथ व पेरी प्रत्येकी 2 बळी, ग्रॅहॅम व वेरहॅम प्रत्येकी 1 बळी)