आरसीबी महिला संघ पहिल्यांदाच विजेता
दिल्ली कॅपिटल्सवर 8 गड्यांनी विजय, मॉलिन्यू सामनावीर, श्रेयांका पाटीलला पर्पल, एलीस पेरीला ऑरेंज कॅप
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
महिलांच्या दुसऱ्या प्रिमीयर लिग टी-20 क्रिकेट स्पर्धेतील रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने यजमान दिल्ली कॅपिटल्सचा 3 चेंडू बाकी ठेवून 8 गड्यांनी दणदणीत पराभव करत पहिल्यांदा जेतेपदावर शिक्कामोर्तब केला. दिल्ली कॅपिटल्सलला सलग दुसऱ्यावर्षी या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. गेल्यावर्षी झालेल्या पहिल्याच स्पर्धेत मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून विजेतेपद हस्तगत केले होते.
दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीला विजयासाठी 114 धावांचे सोपे आव्हान दिले. डावाला दमदार सुरूवात करूनही आरसीबीच्या फिरकी गोलंदाजासमोर दिल्ली कॅपिटल्सचा डाव कोलमडला. आरसीबीच्या श्रेयांका पाटीलने 12 धावात 4 गडीबाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना आरसीबीने 19.3 षटकात 2 बाद 115 धावा जमवित आपला विजय नोंदविला.
या स्पर्धेत आरसीबीच्या एलिस पेरी ऑरेंज कॅपची मानकरी ठरली. तिने 9 सामन्यात सर्वाधिक म्हणजे 347 धावा जमविल्या. आरसीबीची श्रेयांका पाटील ही पर्पल कॅपची मानकरी ठरली. तिने 8 सामन्यातून 13 बळी मिळविले. पर्पल कॅपच्या मानकरी यादीत आरसीबीच्या गोलंदाजानी पहिले तीन क्रमांक पटकाविले. श्रेयांका पाटील पहिल्या, आशा शोभना दुसऱ्या तर मॉलिन्यू तिसऱ्या स्थानावर आहेत. शोभना आणि मॉलिन्यू यांनी प्रत्येकी 12 गडी बाद केले.
कर्णधार मानधना आणि सोफी डीव्हाइन यांनी डावाला सावध सुरूवात करून देताना 49 चेंडूत 49 धावांची भागीदारी केली. शिखा पांडेने डीव्हाइनला पायचीत केले. तिने 27 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 32 धावा जमविल्या. डीव्हाइन बाद झाल्यानंतर मानधना आणि पेरी यानी दुसऱ्या गड्यासाठी 33 धावांची भागीदारी केली. मिन्नू मणीच्या गोलंदाजीवर मानधना रे•ाrकरवी झेलबाद झाली. तिने 39 चेंडूत 3 चौकारासह 31 धावा जमविल्या.
एलीस पेरी आणि रिचा घोष यांनी तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 33 धावांची भागीदारी करत आपल्या संघाला 3 चेंडू बाकी ठेवून 8 गड्यांनी विजय मिळवून दिला. पेरीने 37 चेंडूत 4 चौकारासह नाबाद 35, तर घोषने 14 चेंडूत 2 चौकारासह नाबाद 17 धावा जमविल्या. रे•ाrच्या गोलंदाजीवर घोषने विजयी चौकार ठोकला. आरसीबीच्या डावात 1 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. आरसीबीने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 25 धावा जमविल्या. आरसीबीचे अर्धशतक 50 चेंडूत तर शतक 104 चेंडूत फलकावर लागले. fिंदल्ली कॅपिटल्सतर्फे शिखा पांडे आणि मणी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार लेनिंग आणि शेफाली वर्मा यांनी डावाला दमदार सुरूवात करून देताना 43 चेंडूत 64 धावांची भागीदारी केली. आठव्या शतकातील पहिल्याच चेंडूवर मॉलिन्यूने शेफाली वर्माला वेरहॅमकरवी झेलबाद केले. तिने 27 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारासह 44 धावा तडकावल्या. आरसीबीच्या मॉलिन्यूने आपल्या या षटकातील पुढील 2 चेंडूवर दिल्ली कॅपिटल्सचे रॉड्रीग्ज आणि कॅप्से यांचा त्रिफळा उडविल्याने दिल्ली कॅपिटल्सची स्थिती 3 बाद 64 अशी झाली. श्रेयांका पाटीलने कर्णधार लेनिंगला पायचीत केले. तिने 23 चेंडूत 3 चौकारांसह 23 धावा जमविल्या. शोभनाने कॅपला 8 धावावर झेलबाद केले. तर त्यानंतर शोभनाने आपल्या या षटकातील तिसऱ्या चेंडूवर जोनासेनला मानधनाकरवी झेलबाद केले. राधा यादवने 9 चेंडूत 2 चौकारासह 12 धावा जमविल्या. श्रेयांका पाटीलने मिन्नू मणीला 5 धावावर पायचीत केले. एकेरी धाव घेण्याच्या नादात राधा यादव धावचित झाली. श्रेयांका पाटीलने आपल्या चौथ्या षटकातील दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर दिल्ली कॅपिटल्सच्या रे•ाr आणि भाटीया यांना बाद करून दिल्लीचा डाव 18.3 षटकात 113 धावात गुंडाळला. रे•ाrने 13 चेंडूत 10 तर पांडेने नाबाद 5 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सच्या डावात 3 षटकार आणि 8 चौकार नोंदविले गेले.
दिल्ली कॅपिटल्सने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकात 61 धावा फटकावल्या. दिल्ली कॅपिटल्सचे अर्धशतक 29 चेंडूत तर शतक 95 चेंडूत फलकावर लागले. लेनिंग आणि वर्मा यांनी पहिल्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी 29 चेंडूत नेंदविली. आरसीबीच्या गोलंदाजांनी शिस्तबध्द आणि अचूक गोलंदाजी केल्याने दिल्लीला केवळ 3 अवांतर धावा मिळाल्या. आरसीबीच्या श्रेयांका पाटीलने 12 धावात 4, मॉलिन्यूने 20 धावात 3, तर शोभनाने 14 धावात 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
दिल्ली कॅपिटल्स 18.3 षटकात सर्वबाद 113 (लेनिंग 23, शेफाली वर्मा 44, कॅप 8, जोनासेन 3, राधा यादव 12, मणी 5, रे•ाr 10, पांडे नाबाद 5, अवांतर 3, श्रेयांका पाटील 4-12, मॉलिन्यू 3-20, आशा शोभना 2-14). आरसीबी 19.3 षटकात 2 बाद 115 (स्मृती मानधना 31, सोफी डीव्हाइन 32, एलीस पेरी नाबाद 35, रिचा घोष नाबाद 17, अवांतर 0, पांडे 1-11, मनी 1-12)