आरसीबी महिलांचा सलग दुसरा विजय
दिल्लीवर 8 गड्यांनी मात, सामनावीर रेणुका सिंग, वेअरहॅमचे प्रत्येकी 3 बळी, स्मृतीचे जलद अर्धशतक
वृत्तसंस्था/ वडोदरा
कर्णधार स्मृती मानधनाने नोंदवलेले 47 चेंडूत 81 धावांचे जलद अर्धशतक, सामनावीर रेणुका सिंग व जॉर्जिया वेअरहॅम यांचा भेदक मारा यांच्या बळावर महिला आरसीबी संघाने डब्ल्यूपीएलमधील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 8 गड्यांनी दणदणीत पराभव करून सलग दुसरा विजय नोंदवला.
याआधी पहिल्या सामन्यात त्यांनी विजय मिळविला होता. रेणुका सिंग (23 धावांत 3 बळी), वेअरहॅम (25 धावांत 3 बळी) तसेच किम गार्थ व एकता बिश्त यांनी शिस्तबद्ध व भेदक मारा करीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला 19.3 षटकांत 141 धावांत गुंडाळले. त्यानंतर स्मृती व डॅनी वॅट-हॉज (33 चेंडूत 42) यांनी जलद फटकेबाजी करीत 55 चेंडूत षटकांत 107 धावांची शतकी सलामी देत आरसीबीचा विजय सोपा केला. वॅट-हॉज (33 चेंडूत 7 चोकारांसह 42) बाद झाल्यानंतर आणखी 26 धावांची भर पडल्यानंतर स्मृतीही बाद झाली. तिने 47 चेंडूंच्या खेळीत 10 चौकार, 3 षटकार मारताना 27 चेंडूत अर्धशतक नोंदवले. या स्पर्धेतील हे वेगवान अर्धशतक आहे. रिचा घोष (5 चेंडूत नाबाद 11) व एलिस पेरी (नाबाद 7) यांनी नंतर विजयाचे सोपस्कार 16.2 षटकांत पूर्ण केले. रिचाने विजयी षटकार ठोकत सामना संपवला. आरसीबीने 2 बाद 146 धावा जमविल्या.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी मिळाल्यावर शफाली वर्मा शून्यावर बाद झाल्यानंतरही दिल्लीने पॉवरप्लेमध्ये शानदार फटकेबाजी करीत 1 बाद 55 धावा जमविल्या. पण सातव्या षटकांत जेमिमा रॉड्रिग्ज (22 चेंडूत 34) व कर्णधार मेग लॅनिंग (19 चेंडूत 17) बाद झाल्यानंतर त्यांचा डाव नंतर गडगडला. ठरावीक अंतराने त्यांचे गडी बाद होत गेले आणि अखेरच्या षटकांत त्यांचा डाव 141 धावांत आटोपला. अॅनाबेल सदरलँडने 19, मेरिझेन कीपने 12, साराह ब्राईसने 19 चेंडूत 23, शिखा पांडेने 15 चेंडूत 14 धावा जमविल्या. रेणुका सिंग व वेअरहॅम यांच्याव्यतिरिक्त गार्थ व बिश्त यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. या विजयाने आरसीबीने 4 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले आहे. गुजरात जायंट्स व दिल्ली कॅपिटल्स यांचे प्रत्येकी 2 गुण झाले आहेत.
संक्षिप्त धावफलक : दिल्ली कॅपिटल्स महिला 19.3 षटकांत सर्व बाद 141 : लॅनिंग 17, शफाली 0, जेमिमा 22 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह 34, सदरलँड 13 चेंडूत 19, कॅप 13 चेंडूत 12, साराह ब्राईस 19 चेंडूत 23, शिखा पांडे 15 चेंडूत 14, अवांतर 12. रेणुका सिंग 3-23, वेअरहॅम 3-25, गार्थ 2-19, एकता बिश्त 2-35.
आरसीबी महिला 16.2 षटकांत 2 बाद 146 : स्मृती मानधना 47 चेंडूत 10 चौकार, 3 षटकारांसह 81, वॅट-हॉज 33 चेंडूत 7 चौकारांसह 42, एलीस पेरी नाबाद 7, रिचा घोष 5 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह नाबाद 11, अवांतर 5. शिखा पांडे 1-27, अरुंधती रे•ाr 1-25.