आरसीबी महिलांचा 2 धावांनी विजय
सामनावीर शोभना आशाचे 5 बळी, रिचा घोष, एस. मेघनाची अर्धशतके
वृत्तसंस्था/ बेंगळूर
या मोसामातील महिला प्रिमियर लीगमध्ये पहिल्या सामन्याप्रमाणे शनिवारी दुसरा सामनाही रोमांचक झाला. यूपी वॉरियर्सला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज होती. पण दीप्ती शर्माला मुंबई इंडियन्सच्या सजीवन सजनाची पुनराव़ृत्ती करता आली नाही. तिला या चेंडूवर केवळ 2 धावा करता आल्याने आरसीबीला 2 धावांनी निसटता विजय मिळाला. आरसीबीच्या विजयात शोभना आशाने महत्त्वाची भूमिका बजावली. तिने 22 धावांत 5 बळी मिळविले आणि सामनावीरची मानकरीही ठरली. आज रविवारी मुंबई इंडियन्स व गुजरात जायंट्स यांचा सामना होणार आहे.
रिचा घोष व एस. मेघना यांनी नोंदवलेल्या समयोचित अर्धशतकांमुळे महिला प्रिमियर लीगमधील दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने 20 षटकांत 6 बाद 157 धावा जमवित यूपी वॉरियर्सला 158 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर यूपी वॉरियर्सला 20 षटकांत 7 बाद 155 धावांवर रोखत 2 धावांनी विजय मिळविला. यूपीच्या डावात ग्रेस हॅरिसने सर्वाधिक 38 धावा जमविल्या. तिने 23 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार मारले. याशिवाय श्वेता सेहरावतने 25 चेंडूत 31, मॅकग्राने 18 चेंडूत 22, दिनेश वृंदाने 18, पूनम खेमनारने 7 चेंडूत 14, दीप्ती शर्माने 9 चेंडूत नाबाद 13 धावा जमविल्या. आशाने 5 तर सोफी मोलिन व जॉर्जिया वेअरहॅम यांनी एकेक बळी मिळविले.
मेघना, रिचा घोषची फटकेबाजी
प्रथम फलंदाजी मिळाल्यावर मेघनाने 44 चेंडूत 7 चौकार, एक षटकारासह 53 धावा फटकावल्या तर रिचाने 37 चेंडूतच 12 चौकारांची आतषबाजी करीत 62 धावा तडकावल्या. 7.5 ष्wाटकांत 3 बाद 54 अशा स्थितीनंतर या दोघींनी चौथ्या गड्यासाठी केवळ 50 चेंडूत 71 धावांची भागीदारी केल्यामुळे आरसीबी महिला संघाला दीडशेचा टप्पा गाठता आला. प्रारंभी त्यांनी स्थिरावण्यास थोडा वेळ घेतला आणि स्थिरावल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. मेघनाला 20 व 22 धावांवर जीवदाने मिळाली, त्याचा पूर्ण लाभ घेत चकित करणारी चौफेर फटकेबाजी केली. डावखुरी स्पिनर राजेश्वरी गायकवाडला तिने एक्स्ट्रा कव्हरवर मारलेला लोफ्टेड षटकार पाहण्यालायक होता. तिने 40 चेंडूतच अर्धशतकी मजल मारली. दुसऱ्या बाजूस रिचाने सायमा ठाकोरने टाकलेल्या 14 व्या षटकात टोलेबाजी करीत 16 धावा वसूल केल्या. ताहलिया मॅकग्राला चौकार ठोकून तिने 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. गायकवाडने ही जोडी फोडताना मेघनाला यष्टिचीत केले.
त्याआधी कर्णधार स्मृती मानधना, सोफी डिव्हाईन, एलीस पेरी यांना धावांसाठी झगडावे लागले. धावांची गती वाढवण्याच्या प्रयत्नात त्या स्वस्तात बाद झाल्या. स्मृतीने 13, सोफीने 1, पेरीने 8 धावा जमविल्या. सोफी मॉलिनने नाबाद 9 व श्रेयांका पाटीलने नाबाद 8 धावा जमविल्या. यूपी वॉरियर्सच्या गायकवाडने 24 धावांत 2, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, मॅकग्रा, ग्रेस हॅरिस यांनी एकेक बळीं मिळविला.
संक्षिप्त धावफलक : आरसीबी महिला संघ 20 षटकांत 6 बाद 157 : रिचा घोष 37 चेंडूत 12 चौकारांसह 62, एस. मेघना 44 चेंडूत 7 चौकार, 1 षटकारासह 53, स्मृती मानधना 11 चेंडूत 13, पेरी 7 चेंडूत 8, सोफी मोलिन नाबाद 9, श्रेयांका पाटील 4 चेंडूत एक षटकारासह नाबाद 8, अवांतर 3. गोलंदाजी : गायकवाड 2-24, दीप्ती शर्मा 1-23, एक्लेस्टोन 1-26, मॅकग्रा 1-39, ग्रेस हॅरिस 1-22.
यूपी वॉरियर्स महिला 20 षटकांत 7 बाद 155 : हॅरिस 23 चेंडूत 38, सेहरावत 25 चेंडूत 31, मॅकग्रा 18 चेंडूत 22, वृंदा 18, खेमनार 7 चेंडूत 14, दीप्ती शर्मा 9 चेंडूत नाबाद 13, अवांतर 12. गोलंदाजी : शोभना आशा 5-22, सोफी मोलिन 1-36, वेअरहॅम 1-23.