For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरसीबीचा गुजरातवर 8 गड्यांनी विजय

06:58 AM Feb 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
आरसीबीचा गुजरातवर 8 गड्यांनी विजय
Advertisement

रेणुका सिंग सामनावीर, स्मृतीची चमकदार खेळी, मॉलिन्यूचे 3 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

महिलांच्या दुसऱ्या प्रिमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या पाचव्या सामन्यात यजमान रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने (आरसीबीने) गुजरात जायंट्सचा 45 चेंडू बाकी ठेऊन 8 गड्यांनी दणदणीत पराभव करत चार गुणासह गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले आहे. आरसीबीचा या स्पर्धेतील हा दुसरा विजय आहे. रेणुकासिंग ठाकुरला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement

या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून गुजरात जायंट्सला प्रथम फलंदाजी दिली. रेणुकासिंग ठाकुर तसेच मॉलिन्यू यांच्या अचूक गोलंदाजीसमोर गुजरात जायंट्सने 20 षटकात 7 बाद 107 धावा जमविल्या. सलामीच्या हरलीन देओलने 31 चेंडूत 3 चौकारांसह 22, कर्णधार बेथ मुनीने 7 चेंडूत 2 चौकारांसह 8, लिचफिल्डने 1 चौकारासह 5, वेदा कृष्णमूर्तीने 1 षटकारासह 9, गार्डनरने 7 धावा केल्या. हेमलताने 25 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 31 धावा जमविल्या. स्नेह राणाने 2 चौकारांसह 12 धावा केल्या. ब्राईसने 3 तर तनुजा कंवरने नाबाद 4 धावा जमविल्या. गुजरात जायंट्सला अवांतराच्या रुपात 6 धावा मिळाल्या. त्यांच्या डावामध्ये 2 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. आरसीबीतर्फे मॉलिन्यूने 25 धावात 3, रेणुका सिंगने 14 धावात 2, वेरहॅमने 20 धावात 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना आरसीबीच्या डावामध्ये सलामीची कर्णधार स्मृती मानधना आणि सोफी डिव्हाइन यांनी पहिल्या चेंडूपासूनच फटकेबाजी केली. या जोडीने 20 चेंडूत 32 धावांची भागिदारी केली. गुजरात जायंट्सच्या गार्डनरने डिव्हाइनला मेघना सिंगकरवी झेलबाद केले. तिने 1 चौकारासह 6 धावा जमविल्या. कर्णधार मानधना आणि मेघना यांनी दुसऱ्या गड्यासाठी 32 चेंडूत 40 धावांची भागिदारी केली. मानधनाने 27 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 43 धावा झोडपल्या. डावातील नवव्या षटकात मानधनाला कंवरने स्वत:च्याच गोलंदाजीवर टिपले. मेघना आणि एलीस पेरी यांनी विजयाचे सोपस्कार 13 व्या षटकात पूर्ण केले. एस.मेघनाने 28 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 36 तर पेरीने 14 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 23 धावा जमविल्या. आरसीबीच्या डावात 2 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. गुजरात जायंट्सतर्फे गार्डनर आणि कंवर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक - गुजरात जायंट्स 20 षटकात 7 बाद 107 (देओल 22, मुनी 8, लिचफिल्ड 5, कृष्णमूर्ती 9, गार्डनर 7, हेमलता नाबाद 31, स्नेह राणा 12, कंवर नाबाद 4, अवांतर 6, रेणुकासिंग ठाकुर 2-14, मॉलिन्यू 3-25, वेरहॅम 1-20), आरसीबी 12.3 षटकात 2 बाद 110 (स्मृती मानधना 27 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 43, डिव्हाइन 6, एस. मेघना 28 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 36, पेरी 14 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 23, अवांतर 2, गार्डनर 1-15, कंवर 1-20).

Advertisement
Tags :

.