चेन्नईविरुद्ध आरसीबीची आज फलंदाजीवर भिस्त
वृत्तसंस्था/चेन्नई
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा सामना आज शुक्रवारी येथे होणाऱ्या आयपीएल सामन्यात परिचित प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्सशी होणार आहे. मागील 17 वर्षांपासून चेन्नईविरुद्ध सातत्याने निराशेचा सामना करत आलेला आरसीबी संघ यावेळी इतिहास बदलण्याच्या दृष्टीने आपल्या अनुभवी फलंदाजीच्या क्षमतेवर अवलंबून असेल. 2008 मध्ये स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीत चेपॉक येथे रॉयल चॅलेंजर्सने चेन्नईला फक्त एकदाच हरवले होते. सध्याच्या आरसीबी संघातील फक्त स्टार फलंदाज विराट कोहली त्या क्षणाचा साक्षीदार होता आणि आता दुसऱ्यांदा सीएसकेचा किल्ला सर करणे त्याला आवडेल. पण ते स्वप्न साकारणे सोपे नाही.
नेहमीप्रमाणे चेन्नई संघ फिरकी गोलंदाजांना बरीच मदत करणाऱ्या खेळपट्टीवर त्यांचे घरचे सामने जिंकण्यास सज्ज झाला आहे. त्यांच्याकडे रवींद्र जडेजा आहे आणि गेल्या वर्षीच्या खेळाडूंच्या लिलावात परत आणलेला रविचंद्रन अश्विन यासारखे फिरकीपटू आहेत. शिवाय चेन्नई संघाने अफगाणिस्तानचा डावखुरा मनगटी फिरकी गोलंदाज नूर अहमद यालाही संघात समाविष्ट केले आहे आणि काही दिवसांपूर्वी या तिघांनी पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सविऊद्ध चांगली कामगिरी केलेली आहे. या त्रिकुटाने मुंबईविऊद्ध 11 षटके टाकली आणि पाच गडी मिळविताना 70 धावा दिल्या.
या सामन्यातही खेळपट्टीचे वैशिष्ट्या कायम राहण्याची अपेक्षा आहे आणि कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या फलंदाजांना सीएसकेच्या अनुभवी गोलंदाजांवर मात करण्यासाठी त्यांचा खेळ अनेक पटींनी उंचवावा लागेल. रॉयल चॅलेंजर्सच्या फलंदाजांना चेन्नई सुपर किंग्सच्या तीन फिरकी गोलंदाजांवर वर्चस्व गाजविण्याच्या दृष्टीने आक्रमकतेपेक्षा हुशारीने वागावे लागेल आणि कोहलीला त्याचे नेतृत्व करावे लागेल. फिरकी गोलंदाजांना प्रभावीपणे सामोरे जाणे हा नेहमीच कोहलीच्या फलंदाजीचा मजबूत दुवा राहिलेला नाही. परंतु गेल्या दोन वर्षांत त्याने त्या विभागात मोठी सुधारणा दाखवली आहे.
या बदलाचा केंद्रबिंदू हा फिरकी गोलंदाजांविऊद्ध अधिक स्वीप-स्लॉग स्वीप खेळण्याची त्याची तयारी हा राहिला आहे. आज शुक्रवारी संध्याकाळी होणाऱ्या या ब्लॉकबस्टर लढतीमध्ये कोहलीला त्या सर्व कौशल्यांचा वापर करावा लागेल. पण एकटा कोहली सीएसकेच्या सक्षम गोलंदाजीवर पूर्णपणे वर्चस्व गाजवू शकणार नाही. त्याला फिल सॉल्ट, कर्णधार रजत पाटीदार, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा इत्यादींच्या पूर्ण सहकार्याची आवश्यकता भासेल. चेपॉकच्या खेळपट्टीकडे पाहता आरसीबी कदाचित टिम डेव्हिडऐवजी जेकब बेथेलला संधी देण्याचा विचार करू शकतो.
कारण बेथेल डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीचा पर्याय उपलब्ध करू शकतो. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या फिटनेसवर देखील त्यांचे लक्ष असेल. दुखापतीमुळे केकेआरविऊद्धचा पहिला सामना भुवनेश्वरने गमावला होता आणि जर हा अनुभवी खेळाडू तंदुऊस्त असेल, तर तो रसिख सलामची जागा घेईल. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्स त्यांच्या मधल्या फळीला सूर मिळेल अशी अपेक्षा बाळगून असेल. कारण शिवम दुबे, दीपक हुडा आणि सॅम करन गेल्या सामन्यात मुंबईविऊद्ध अपयशी ठरले. त्यांना रचिन रवींद्र आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांना अधिक पाठिंबा द्यावा लागेल तसेच एम. एस. धोनीच्या आणखी एका मजबूत कामगिरीची त्यांना गरज लागेल. सीएसके मुंबईविऊद्धच्या सामन्यात न खेळलेला वेगवान गोलंदाज मथीशा पथिरानाच्या फिटनेसवर देखील बारकाईने लक्ष ठेवून असेल. हा श्रीलंकी खेळाडू वेळेत तंदुरुस्त झाल्यास ते नॅथन एलिसला बाहेर बसवू शकतात.
चेन्नई सुपर किंग्स-ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एम. एस. धोनी, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथीशा पथीराना, नूर अहमद, रविचंद्रन अश्विन, डेव्हॉन कॉनवे, सय्यद खलील अहमद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, सॅम करन, शेख रशिद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, दीपक हुडा, गुरजनप्रीत सिंग, नॅथन एलिस, जेमी ओव्हरटन, कमलेश नागरकोटी, रामकृष्णन घोष, श्रेयस गोपाल, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, जोश हेझलवूड, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, रसिक सलाम, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, नुवान तुषारा, मनोज भंडागे, जेकब बेथेल, देवदत्त पडिक्कल, स्वस्तिक चिकारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.