‘आरसीबी’चा आज सनरायझर्स हैदराबादशी मुकाबला
वृत्तसंस्था/मडगांव
प्लेऑफमध्ये पोहोचल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आज शुक्रवारी येथे होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना करताना नऊ वर्षांत प्रथमच साखळी फेरीतील आघाडीच्या दोन संघांत स्थान मिळविण्याचे लक्ष्य ठेवेल. आरसीबी 2016 च्या हंगामापासून आघाडीच्या दोन संघांमध्ये स्थान मिळवू शकलेला नाही. 2016 मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. सध्या 12 सामन्यांमधून 17 गुणांसह ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. उर्वरित दोन सामन्यांमध्ये विजय मिळविल्यास त्यांना आघाडीच्या दोन संघांत स्थान मिळवण्याची शक्यता आहे. आजचा सामना मुळात बेंगळूर संघाच्या घरच्या मैदानावर होणार होता, पण पावसाळ्याच्या सुऊवातीमुळे तो हलवण्यात आला आहे. भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षामुळे लीगमध्ये खंड पडण्यापूर्वी आरसीबी जोरदार फॉर्ममध्ये होता आणि संघाने सलग चार विजय मिळवले होते. परंतु लीग पुन्हा सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे हा वेग थांबला.
20 दिवसांच्या विश्रांतीनंतर आरसीबी त्यांची लय आणि स्पर्धात्मक धार टिकवून ठेवू शकतो का, हे पाहणे रंजक ठरेल. आयपीएलच्या किताबाचा पाठलाग करताना आरसीबीने अलीकडच्या काळातील त्यांच्या सर्वांत सातत्यपूर्ण मोहिमांपैकी एक आतापर्यंत यशस्वीरीत्या पार पाडली आहे. विश्वासार्ह विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने 11 डावांमध्ये सात अर्धशतके झळकावली आहेत आणि वरच्या फळीला आधार दिला आहे. कर्णधार रजत पाटीदार, टिम डेव्हिड आणि रोमॅरियो शेफर्ड यांनी वेळेवर जोरदार फटकेबाजी करून त्याला पूरक काम केले आहे. असे असले तरी, खंड पडण्याच्या अगदी आधी पाटीदारचा फॉर्म कमी झाला होता. पहिल्या पाच सामन्यांत त्याने 37.2 च्या सरासरीने धावा काढल्या, तर पुढील पाच सामन्यांत तो 10.6 च्या सरासरीने फक्त 53 धावा करू शकला.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : रजत पाटीदार (कर्णधार), फिल सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जोश हेझलवूड, यश दयाल, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, नुवान तुषारा, लुंगी एनगिडी, मोहित राठी, स्वस्तिक चिकारा, अभिनंदन सिंग.
सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), इशान किशन, अथर्व तायडे, अभिनव मनोहर, अनिकेत वर्मा, सचिन बेबी, स्मरण रविचंद्रन, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, हर्षल पटेल, कामिंदू मेंडिस, विआन मुल्डर, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद शमी, राहुल चहर, सिमरजित सिंग, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, एशान मलिंगा.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7:30 वा.