For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरसीबी प्लेऑफसाठी पात्र

06:29 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
आरसीबी प्लेऑफसाठी पात्र
Advertisement

मुंबई इंडियन्सवर 7 गड्यांनी विजय, सामनावीर एलीस पेरीचे 15 धावात 6 बळी, रिचा घोषची उत्तम साथ

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

महिलांच्या दुसऱ्या प्रिमीयर लिग टी-20 क्रिकेट स्पर्धेतील मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात ‘सामनावीर’ इलेसी पेरीच्या शानदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आरसीबीने बलाढ्या मुंबई इंडियन्सचा 5 षटके बाकी ठेवून 7 गड्यांनी दणदणीत पराभव केला आणि प्लेऑफसाठी पात्रता मिळविली. शुक्रवारी कदाचित याच संघाविरुद्ध त्यांची एलिमिनेटर लढत होईल.

Advertisement

या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी दिली. मुंबई इंडियन्सचा डाव 19 षटकात 113 धावात आटोपला. त्यानंतर आरसीबीने 15 षटकात 3 बाद 115 धावा जमवित सहज विजय नोंदविला. आज बुधवारी दिल्ली कॅपिटल्स व गुजरात जायंट्स यांच्यात सामना होणार आहे.

मुंबई इंडियन्सच्या डावात सलामीच्या मॅथ्यूजने 23 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारासह 26, सजनाने 21 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 30, नॅट सिव्हर ब्रन्टने 15 चेंडूत 1 चौकारासह 10, प्रियांका बालाने 18 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 19 धावा जमविल्या. इस्माईलने 1 चौकारासह 8 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रित कौरला खाते उघडता आले नाही. मुंबई इंडियन्सने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 43 धावा जमविताना 1 गडी गमविला. मॅथ्यूज आणि सजना यांनी सलामीच्या गड्यासाठी 36 चेंडूत 43 धावा जमविल्या. मुंबईचे अर्धशतक 45 चेंडूत तर शतक 98 चेंडूत फलकावर लागले. मुंबईच्या डावात 3 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. आरसीबीच्या एलीस पेरीने 15 धावात 6, तर मॉलीन्यू, डिव्हाइन, शोभना आणि श्रेयांका पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना आरसीबीच्या डावामध्ये कर्णधार स्मृती मानधना आणि मॉलीन्यू यानी 20 चेंडूत 22 धावांची भागीदारी केली. मॅथ्यूजने मॉलीन्यूला बालाकरवी यष्टीचित केले. तिने 9 चेंडूत 2 चौकारांसह 9 धावा जमविल्या. मुंबई इंडियन्सच्या नॅट सिव्हर ब्रन्टने कर्णधार मानधनाला झेलबाद केले. तिने 13 चेंडूत 2 चौकारांसह 11 धावा जमविल्या. ईस्माईलने डिव्हाइनचा 4 धावावर त्रिफळा उडविला. आरसीबीची स्थिती यावेळी 6.1 षटकात 3 बाद 39 अशी होती. रिचा घोष आणि एलीस पेरी यानी चौथ्या गड्यासाठी अभेद्य 76 धावांची भागीदारी करत आपल्या संघाला 30 चेंडू बाकी ठेवून 7 गड्यांनी विजय मिळवून दिला. पेरीने 38 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह नाबाद 40, घोषने 28 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 36 धावा जमविल्या. पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात आरसीबीने 39 धावा जमविताना 2 गडी गमविले. आरसीबीचे अर्धशतक 51 चेंडूत तर शतक 84 चेंडूत फलकावर लागले. मुंबई इंडियन्सतर्फे ईस्माईल, मॅथ्यूज, नॅट सिव्हर ब्रन्ट यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. आरसीबीच्या डावात 3 षटकात आणि 14 चौकार नोंदविले गेले. आता या स्पर्धेत गुणतक्यात दिल्ली कॅपिटल्स पहिल्या स्थानावर असून मुंबई इंडियन्स 10 गुणांसह  दुसरे तर आरसीबीने 8 गुणांसह तिसरे स्थान घेतले आहे.

संक्षिप्त धावफलक : मुंबई इंडियन्स 19 षटकात सर्व बाद 113 (मॅथ्यूज 26, सजना 30, नॅट सिव्हर ब्रन्ट 10, प्रियांका बाला 19, अवांतर 3, एलीस पेरी 6-15, मॉलीन्यू 1-26, डिव्हाइन 1-21, शोभना 1-12, श्रेयांका पाटील 1-3), आरसीबी 15 षटकात 3 बाद 115 (मानधना 11, मॉलीन्यू 9, एलीस पेरी नाबाद 40, डिव्हाइन 4, रिचा घोष नाबाद 36, अवांतर 15, ईस्माईल 1-19, मॅथ्यूज 1-11, नॅट सिव्हर ब्रन्ट 1-18).

Advertisement
Tags :

.