For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

218 धावांच्या आघाडीसह भारताचे कसोटीवर वर्चस्व

06:58 AM Nov 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
218 धावांच्या आघाडीसह भारताचे कसोटीवर वर्चस्व
Advertisement

बुमराहचे 5 बळी, जैस्वाल-राहुल यांची अभेद्य दीड शतकी भागिदारी

Advertisement

वृत्तसंस्था / पर्थ

कर्णधार जसप्रित बुमराहची भेदक गोलंदाजी तसेच यशस्वी जैस्वल आणि के. एल. राहुल यांच्या सलामीच्या गड्यासाठी नोंदविलेल्या अभेद्य दीड शतकी भागिदारीच्या जोरावर येथे पहिल्या कसोटीत खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर भारताने यजमान ऑस्ट्रेलियावर 218 धावांची भक्कम आघाडी घेत आपले वर्चस्व राखले आहे. बुमराहने 30 धावांत 5 गडी बाद केले तर जैस्वाल आणि राहुल यांनी अनुक्रमे 90 आणि 62 धावांवर खेळत असून त्यांनी अभेद्य 172 धावांची दीड शतकी भागिदारी केली आहे.

Advertisement

या कसोटीतील खेळाच्या पहिल्या दिवशी पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर उभय संघातील जलद गोलंदाजांनी धुमाकूळ घालताना 17 बळी मिळविले होते. पण शनिवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांकडून निराशा झाली. मात्र ऑस्ट्रेलियाने आपले शेवटचे 3 गडी 37 धावांत गमविले. त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि अनुभवी के. एल. राहुल या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर समर्थपणे टिच्चुन फलंदाजी करत दिवसअखेर आपल्या संघाला सुस्थितीत नेले.

बुमराहचे 5 बळी

शनिवारी दुसऱ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ झाल्यानंतर कॅरे आणि स्टार्क या नाबाद राहिलेल्या जोडीने भारताच्या वेगवान गोलंदाजीसमोर चाचपडत फलंदाजी केली. खेळ सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच षटकातील पहिल्या चेंडूवर बुमराहने अॅलेक्स कॅरेला बाहेर जाणाऱ्या चेंडूवर यष्टीरक्षक पंतकरवी झेलबाद केले. कॅरेने कालच्या आपल्या धावसंख्येत केवळ दोन धावांची भर घातली. कॅरे 31 चेंडूत 3 चौकारांसह 21 धावांवर बाद झाला. बुमराहचा या डावातील हा पाचवा बळी ठरला. मिचेल स्टार्क आणि हॅजलवूड यांनी शेवटच्या गड्यासाठी 18 षटकात 25 धावांची भागिदारी केल्याने ऑस्ट्रेलियाला 104 धावांपर्यंत मजल मारता आली. तत्पूर्वी हर्षित राणाने लियॉनला राहुलकरवी झेलबाद केले. त्याने 16 चेंडूत 5 धावा जमविल्या. मिचेल स्टार्कने 112 चेंडूत 2 चौकारांसह 26 धावा जमविल्या. हर्षित राणाने स्टार्कला पंतकडे झेल देण्यास भाग पाडले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 51.2 षटकात 104 धावांवर ऑटोपला. भारताने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियावर 46 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविली. बुमराहने 30 धावांत 5 बळी तर हर्षित राणाने 48 धावांत 3 गडी तसेच मोहम्मद सिराजने 20 धावांत 2 बळी घेतले. उपाहारावेळी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव समाप्त झाला. हर्षित राणाने आपल्याकसोटी पदार्पणात चांगली कामगिरी करत बुमराहला साथ दिली.

भारताची दमदार सुरुवात

यशस्वी जैस्वाल आणि के. एल. राहुल या सलामीच्या जोडीने भारताच्या दुसऱ्या डावाला दमदार सुरुवात केली. चहापानापर्यंतच्या दुसऱ्या सत्रामध्ये भारताने 26 षटकात बिनबाद 84 धावा जमविल्या. चहापानावेळी जैस्वाल 42 तर के. एल. राहुल 34 धावांवर खेळत होते. यशस्वी जैस्वालचा खेळ राहुलच्या तुलनेत अधिक आक्रमक होता. मात्र या दोन्ही फलंदाजांनी खेळपट्टीचा अंदाज घेत ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीला समर्थपणे पेलले. चहापानापर्यंत भारताने ऑस्ट्रेलियावर 130 धावांची आघाडी मिळविली होती. चहापानापर्यंतच्या सत्रात राहुलने 70 चेंडूत 34 तर जैस्वालने 88 चेंडूत 42 धावा जमविल्या होत्या. के. एल. राहुलने कमिन्सच्या गोलंदाजीवर ऑफ ड्राईव्हचा शानदार फटका मारला. तर जैस्वालने स्टार्क आणि हॅजलवूड यांच्या उसळत्या चेंडूचा योग्य अंदाज घेत फटकेबाजी केली. कर्णधार कमिन्सने स्लिपमध्ये क्षेत्ररक्षकांचे जाळे ठेवले असतानाही जैस्वालने सावध फलंदाजी करत फटकेबाजी केली. या दोन्ही फलंदाजांनी फटक्यांची निवड योग्यरित्याने केल्याने ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज यशस्वी ठरु शकले नाहीत.

शतकी भागिदारी

जैस्वाल आणि के. एल. राहुल यांनी खेळाच्या शेवटच्या सत्रात 88 धावांची भर घातली. चहापानानंतर भारताच्या या सलामीच्या जोडीने शतकी भागिदारी 229 चेंडूत नोंदविली. दरम्यान जैस्वालने आपले अर्धशतक 123 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने झळकविले. चहापानानंतरच्या पहिल्या जलपणाखेर भारताने 43 षटकात बिनबाद 106 धावा जमविल्या होत्या. के. एल. राहुलने 124 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. या जोडीने सलामीच्या गड्यासाठी दीड शतकी भागिदारी 308 चेंडूत नोंदविली. अर्धशतकानंतर जैस्वालने आक्रमक फलंदाजीवर अधिक भर दिला. कर्णधार कमिन्सने भारताची ही जोडी फोडण्यासाठी गोलंदाजीत वारंवार बदल केला. पण त्याला यश मिळाले नाही. त्याने या कालावधीत सात गोलंदाजांना संधी दिली होती. जैस्वाल 193 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह 90 तर राहुल 153 चेंडूत 4 चौकारांसह 62 धावांवर खेळत आहेत.

राहुल-जैस्वालचा आगळा विक्रम

यशस्वी जैस्वाल आणि के. एल. राहुल या सलामीच्या जोडीने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीत सलामीच्या गड्यासाठी 2004 नंतर सर्वाधिक धावांचा आगळा विक्रम नोंदविला आहे. 2004 नंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर या जोडीचा हा सर्वोच्च विक्रम नोंदविला गेला आहे. 2004 साली सिडनीमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात विरेंद्र सेहवाग आणि आकाश चोप्रा यांनी सलामीच्या गड्यासाठी 123 धावांच्या भागिदारीचा विक्रम केला होता. तत्पूर्वी म्हणजे 1986 साली सिडणीच्या मैदानावर सुनील गावसकर आणि के. श्रीकांत या सलामीच्या जोडीने 191 धावांची शतकी भागिदारी केली होती. के. एल. राहुलचा इ.स. 2000 नंतर सलामीच्या गड्यासाठी नोंदविलेल्या शतकी विक्रमामध्ये तीनवेळा समावेश आहे. राहुलने विरेंद्र सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. के. एल. राहुल आणि सेहवाग यांनी हे शतकी भागिदारीचे विक्रम द. आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध केले आहे.

जसप्रित बुमराहचा विक्रम

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहने पर्थच्या खेळपट्टीवर आपल्या भेदक माऱ्याच्या जोरावर 30 धावांत 5 गडी बाद केले. जसप्रित बुमराहची कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 5 गडी बाद करण्याची ही सातवी वेळ असून त्याने भारताचा माजी कर्णधार कपिल देवच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. बुमराहने ही कामगिरी द. आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध केली आहे. पर्थच्या कसोटीत त्याने 18 षटकामध्ये ऑस्ट्रेलियाचे 5 गडी बाद केले. बुमराहने या प्रमुख संघाविरुद्ध 27 कसोटीत 22.55 धावांच्या सरासरीने 118 गडी बाद केले असून त्याची कसोटीतील 33 धावांत 6 ही सर्वोच्च कामगिरी आहे. कपिल देवने एका डावात 7 गडी बाद केले होते. झहीर खान, बी. एस. चंद्रशेखर यांनी सहावेळा एका डावात 5 गडी तसेच बिशनसिंग बेदी आणि अनिल कुंबळे यांनी 5 वेळा एका डावात 5 गडी बाद केले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 5 बळी घेणारा बुमराह हा भारताचा पाचवा कर्णधार आहे. यापूर्वी असा विक्रम माजी कर्णधार अनिल कुंबळेने मेलबोर्नच्या मैदानावर 2007 साली ऑस्ट्रेलिया विरुद्धकरताना एका डावात 84 धावांत 5 गडी बाद केले होते पण ऑस्ट्रेलियाने हा सामना 337 धावांनी जिंकला होता. बुमराहने आतापर्यंत जोहान्सबर्ग, मेलबोर्न, नॉटिंगहॅम, नॉर्थसाऊंड, किंग्जस्टन, बेंगळूर, केपटाऊन, विशाखापट्टनम् आणि पर्थ या मैदानांवर हे विक्रम केले आहेत.

ऋषभ पंतचा विक्रम

भारताचा यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंत याने विश्व कसोटी चॅम्पियनशीप अंतर्गत कसोटी सामन्यात यष्टीमागे 100 बळी मिळविण्याचा विक्रम केला आहे. पर्थमध्ये सध्या सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत पंतने हर्षित राणाच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाच्या स्टार्कचा झेल टिपला. पंतचा हा यष्टीमागील 100 वा झेल ठरला. विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेत असा विक्रम करणारा पंत हा तिसरा यष्टीरक्षक आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा अॅलेक्स कॅरे आणि विंडीजचा जोशुआ डिसील्वा यांनी के विक्रम नोंदविले आहेत. कॅरेने 33 सामन्यात 137 तर डिसिल्वाने 30 सामन्यात 103 झेल टिपले आहेत.

संक्षिप्त धावफलक: भारत प. डाव 49.4 षटकात सर्वबाद 150 (ऋषभ पंत 37, ज्युरेल 11, नितीशकुमार रे•ाr 41, अवांतर 11, हॅजलवूड 4-29, स्टार्क 2-14, कमिन्स 2-67, मिचेल मार्श 2-12), ऑस्ट्रेलिया प. डाव 51.2 षटकात सर्वबाद 104 (कॅरे 21, स्टार्क 26, हेड 11, मॅकस्वेनी 10, अवांतर 5, बुमराह 30 धावांत 5 बळी, हर्षित राणा 3-48, मोहम्मद सिराज 2-20), भारत दु. डाव 57 षटकात बिनबाद 172 (यशस्वी जैस्वाल खेळत आहे 90, के. एल. राहुल खेळत आहे 62, अवांतर 20)

Advertisement
Tags :

.