9 वर्षानंतर आरसीबी फायनलमध्ये
क्वालिफायरमध्ये पंजाबवर 8 गड्यांनी मात : फिल सॉल्टची नाबाद अर्धशतकी खेळी : सामनावीर सुयश शर्मा, हेजलवूडचे प्रत्येकी तीन बळी
वृत्तसंस्था/चंदिगड
आरसीबीने गुरुवारी दणकेबाज कामगिरी करत आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. क्वालिफायर-1 मध्ये पंजाब किंग्जचा 8 विकेट्सने पराभव झाला. विशेष म्हणजे, 9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरसीबीने आयपीएलची फायनल गाठली आहे. प्रारंभी, आरसीबीने पंजाबचा 101 धावांत खुर्दा उडवला आणि विजयाचा पाया रचला. ही धावसंख्या विजयासाठी माफक होती आणि त्यांनी ती आठ विकेट्स राखत सहजपणे पार करत विजय मिळवला. या विजयासह आरसीबी फायनलमध्ये पोहोचली आहे, तर पंजाबच्या संघाला फायनलमध्ये पोहोचण्याची अजून एक संधी आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय पूर्णपणे योग्य ठरला.
फिल सॉल्टची नाबाद अर्धशतकी खेळी
आरसीबीचा संघ विजयासाठी 102 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला खरा, पण त्यांना विराट कोहलीच्या रुपात मोठा धक्का बसला. विराट कोहलीला यावेळी 12 धावांवर समाधान मानावे लागले. विराटनंतर मयांक अगरवालही 19 धावांवर बाद झाला. फिल सॉल्टने मात्र आक्रमक शैलीत खेळताना पंजाबच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने 27 चेंडूत 6 चौकार व 3 षटकारासह नाबाद 56 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याला कर्णधार रजत पाटीदारने नाबाद 15 धावा करत चांगली साथ दिली. सॉल्टच्या या दणकेबाज खेळीच्या जोरावर आरसीबीने विजयी आव्हान 10 षटकांतच पूर्ण करत विजय मिळवला.
दीर्घ प्रतीक्षेनंतर अंतिम फेरीत
मुल्लानपूर येथे झालेल्या लढतीत आरसीबीने पंजाबला सहज नमवत 9 वर्षानंतर अंतिम फेरी गाठली आहे. आरसीबीची ही अंतिम सामन्यात पोहोचण्याची एकूण चौथी वेळ आहे. यापूर्वी 2009, 2011 आणि 2016 साली त्यांनी अंतिम फेरी गाठली होती. मात्र तिन्ही वेळेला त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यंदा आता ते पहिले विजेतेपद जिंकण्याचा प्रयत्न 3 जूनला अहमदाबादमध्ये करतील. या पराभवानंतरही पंजाबचे आव्हान अद्याप संपलेले नाही. त्यांना अजूनही अंतिम सामना गाठण्यासाठी दुसरी संधी मिळणार आहे. ते आता 1 जून रोजी क्वालिफायर 2 सामन्यात खेळतील. 30 मे रोजी एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील विजयी संघाविरुद्ध क्वालिफायर 2 मध्ये पंजाबला दोन हात करावे लागणार आहे.
संक्षिप्त धावफलक
पंजाब किंग्स 14.1 षटकांत सर्वबाद 101 (मार्क स्टोइनिस 26, प्रभसिमरन सिंग 18, ओमरझाई 18, हेजलवूड व सुयश शर्मा प्रत्येकी तीन बळी, यश दयाल 2 बळी) आरसीबी 10 षटकांत 2 बाद 106 (फिल सॉल्ट 27 चेंडूत 6 चौकार व 3 षटकारासह नाबाद 56, विराट कोहली 12, मयांक अगरवाल 19, रजत पाटीदार नाबाद 15, मुशीर खान व जेमिसन प्रत्येकी एक बळी).