For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबईला नमवून आरसीबी अंतिम फेरीत

06:58 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुंबईला नमवून आरसीबी अंतिम फेरीत
Advertisement

अष्टपैलू एलीस पेरी सामनावीर, दिल्ली कॅपिटल्स -आरसीबी अंतिम लढत रविवारी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

महिलांच्या दुसऱ्या प्रिमीयर लिग टी-20 स्पर्धेतील येथील जेटली स्टेडियमवर शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या लो स्कोरींग चुरशीच्या एलिमिनेटर सामन्यात आरसीबीने मुंबई इंडियन्सचा फक्त 5 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सचे सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळविण्याचे स्वप्न अधुरे राहिले. आता आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रविवारी जेतेपदासाठी सामना होईल. आरसीबीच्या अष्टपैलू एलीस पेरीला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. पेरीने फलंदाजीत 50 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 66 धावा तर गोलंदाजीत 29 धावात 1 गडी बाद केला.

Advertisement

आरसीबीने 20 षटकात 6 बाद 135 धावा जमवित मुंबई इंडियन्सला विजयासाठी 136 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबई इंडियन्सने 20 षटकात 6 बाद 130 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 5 धावांनी गमवावा लागला.

या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार स्मृती मानधना आणि डीव्हाइन यांनी पहिल्या चेंडूपासून आक्रमक फलंदाजीवर भर दिला. या जोडीने 12 चेंडूत 20 धावा जमिवल्या. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सच्या मॅथ्यूजने डीव्हाइनचा त्रिफळा उडविला. तिने 7 चेंडूत 2 चौकारासह 10 धावा जमविल्या. आरसीबीला आणखी एक धक्का मुंबईकडून मिळाला. नॅट सिव्हर ब्रन्टने सलामीच्या कर्णधार स्मृती मानधनाला इस्माईलकरवी झेलबाद केले. मानधनाने 7 चेंडूत 2 चौकारासह 10 धावा जमविल्या. आरसीबीने आणखी एक फलंदाज पाठोपाठ गमविला. Eिदिशा कसाट ईशाकच्या गोलंदाजीवर वस्त्रकारकरवी झेलबाद झाली. तिला आपले खाते उघडता आले नाही. अष्टपैलू रिचा घोष आणि पेरी संघाला सावरेल असे वाटत असतानाच मॅथ्यूजने घोषला झेलबाद केले. fितने 19 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 14 धावा जमविताना पेरीसमवेत चौथ्या गड्यासाठी 26 धावांची भर घातली. मॉलीन्यूने पेरीसमवेत पाचव्या गड्यासाठी 35 धावांची भागीदारी केली. नॅट सिव्हर ब्रन्टने मॉलीन्यूला 11 धावावर त्रिफळाचित केले. मात्र एका बाजूने एलीस पेरी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करीत होती. वेरहॅम आणि पेरी यानी सहाव्या गड्यासाठी 42 धावांची भागीदारी केल्याने आरसीबीला 135 धावापर्यंत मजल मारता आली. शेवटच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सायका इशाकने पेरीला झेलबाद केले. पेरीने 50 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारासह 66 धावा जमविल्या.  वेरहॅमने 10 चेंडूत 1 षटकार 1 चौकारासह नाबाद 18 तर श्रेयांका पाटीलने नाबाद 3 धावा केल्या. या सामन्यात आरसीबीला केवळ 3 धावा अवातंराच्या रूपात मिळाल्या. मुंबई इंडियन्सची गोलंदाजी शिस्तबध्द आणि अचूक झाल्याने आरसीबीला मोठी धावसंख्या गाठता आली नाही.

आरसीबीच्या डावामध्ये 3 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. आरसीबीने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 34 धावा जमविताना 3 गडी गमविले. आरसीबीचे अर्धशतक 59 चेंडूत तर शतक 100 चेंडूत फलकावर लागले. पेरीने 40 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह अर्धशतक झळकविले. मुंबई इंडियन्सतर्फे मॅथ्यूज, नॅट सिव्हर ब्रन्ट आणि इशाक यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना भाटीया आणि मॅथ्यूज यानी सलामीच्या गड्यासाठी 23 चेंडुत 27 धावांची भागीदारी केली. श्रेयांका पाटीलने मॅथ्यूजला वेरहॅमकरवी झेलबाद केले. तिने 14 चेंडूत 3 चौकारासह 15 धावा जमविल्या. नॅट सिव्हर ब्रन्ट आणि यास्तिका भाटीया यांनी दुसऱ्या गड्यासाठी 23 धावांची भर घातली. पेरीच्या गोलंदाजीवर भाटीयाचा त्रिफळा उडाला. तिने 27 चेंडूत 3 चौकारासह 19 धावा केल्या. यानंतर नॅट सिव्हर ब्रन्ट वेरहॅमच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका मारण्याच्या नादात त्रिफळाचीत झाली. ब्रन्ट आणि कर्णधार कौर यांनी तिसऱ्या गड्यासाठी 18 धावांची भर घातली. यानंतर कर्णधार कौरला अॅमेलीया केरकडून चांगली साथ लाभली या जोडीने चौथ्या गड्यासाठी 52 धावांची भागीदारी केली.पण उत्तुंग फटका मारण्याच्या नादात कौर बाद झाली आणि हाच मुंबईसाठी टर्निंग पॉईंट ठरला. 18 व्या षटकात श्रेयांका पाटीलने कौरला डीव्हाइनकरवी झेलबाद केले. कौरने 30 चेंडूत 4 चौकारांसह 33 धावा जमविल्या. कैर बाद झाल्यानंतर सामन्याला कलाटणी मिळाली. शेवटच्या दोन षटकामध्ये मुंबई इंडियन्सला विजयासाठी 15 धावांची गरज होती. मॉलीन्यूने सजनाला घोषकरवी यष्टीचित केले. तिने 1 धावा जमविली. यानंतर शोभनाने पूजा वस्त्रकारला डावातील शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर घोषकरवी यष्टीचित केले. पूजाने 4 धावा जमविल्या. मुंबई इंडियन्सला शेवटच्या दोन चेंडूत विजयासाठी 8 धावांची गरज होती. दरम्यान  केरला या धावा घेणे अवघड गेल्याने अखेर आरसीबीने हा सामना 5 धावांनी जिंकला. मुंबई इंडियन्सच्या डावात 16 चौकार नोंदविले गेले. आरसीबीतर्फे श्रेयांका पाटीलने 2, तर डीव्हाइन, पेरी, मॉलीन्यू आणि शोभना यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मुंबई इंडियन्सने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 37 धावा जमविताना 1 गडी गमविला. त्यांचे अर्धशतक 47 चेंडूत तर शतक 96 चेंडूत फलकावर लागले.

संक्षिप्त धावफलक : आरसीबी 20 षटकात 6 बाद 135 (मानधना 10, डीव्हाइन 10, पेरी 66, घोष 14, मॉलिन्यू 11, वेरहॅम नाबाद 18, पाटील नाबाद 3, अवांतर 3, मॅथ्यूज 2-18, नॅट सिव्हर ब्रन्ट 2-18, ईशाकी 2-27)

मुंबई इंडियन्स 20 षटकात 6 बाद 130 (यास्तिका भाटीया 19, मॅथ्यूज 15, हरमनप्रित कौर 33, नॅट सिव्हर ब्रन्ट 23, अॅमेलीया केर नाबाद 27, सजना 1, वस्त्रकार 4, अमनज्योत कौर नाबाद 1, अवांतर 7, श्रेयांका पाटील 2-16, पेरी 1-29, मॉलिन्यू 1-16, वेरहॅम 1-37, शोभना 1-13)

Advertisement
Tags :

.