‘आरसीबी’समोर आज राजस्थानविरुद्ध सुधारित कामगिरीचे लक्ष्य
वृत्तसंस्था/ बेंगळूर
स्वत:च्या मैदानावर फॉर्म मिळविण्यासाठी संघर्ष करत असलेले रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आज गुरुवारी येथे राजस्थान रॉयल्सशी सामना करताना त्यांच्या आयपीएल मोहिमेवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करतील. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचे तीन सामन्यांमध्ये झालेले पराभव हा या स्पर्धेतील सर्वांत मोठा विरोधाभास आहे. देशाच्या सर्व भागांमध्ये जोरदार प्रतिस्पर्धी संघ ठरलेला आरसीबी त्यांच्याच बालेकिल्यात फिका पडलेला आहे.
आरसीबीचे फलंदाज येथे विचित्रपणे दबलेले आणि त्यांचे गोलंदाज आपले कौशल्य विसरल्यागत दिसून आलेले आहेत. याचा केंद्रबिंदू येथील खेळपट्टीचे बदललेले स्वरूप आहे, ज्यामुळे गोलंदाजांना काही प्रमाणात पकड मिळाली आहे. बेंगळूरच्या फलंदाजांना खेळपट्टीच्या संथपणावर मात करण्यासाठी अद्याप योग्य गती सापडलेली नाही. त्यामुळे ते आत्मविश्वासाने आक्रमक पद्धतीने खेळायचे की नाही या दुविधेत अडकलेले दिसत आहेत.
आतापर्यंतच्या संघाच्या 8 बाद 169, 7 बाद 163 आणि 9 बाद 95 (14 षटकांत) या एकूण धावसंख्यांवरून हे स्पष्ट होते. इतर ठिकाणी त्यांनी प्रति षटक 9-10 पेक्षा जास्त गतीने धावा केल्या आहेत, परंतु येथे हा वेग 7-8 धावा प्रति षटक असा घसरलेला आहे. त्यांचा मुख्य आधारस्तंभ विराट कोहली या हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये आहे. परंतु फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार रजत पाटीदार यांच्याकडून अधिक अपेक्षा केल्या जातील. भुवनेश्वर कुमारच्या नेतृत्वाखालील गोलंदाजीची कथाही वेगळी नाही. खेळपट्टीने काही प्रमाणात मदत केलेली असूनही त्यांना येथील परिस्थितीचा पूर्णपणे वापर करता आलेला नाही.
आरसीबीकडे सध्या 10 गुण असून ते तिसऱ्या स्थानावर आहेत. परंतु पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्सकडेही 10 गुण आहेत. मुंबई इंडियन्स आठ गुणांसह हळूहळू वर येत आहे. म्हणून अनुकूल निकाल आरसीबीला गुंतागुंतीची परिस्थितीची टाळण्याच्या दृष्टीने आज आवश्यक आहे. दुसरीकडे, राजस्थानच्या बाबतीत पोटाच्या दुखापतीमुळे संजू सॅमसन या सामन्याला मुकणार आहे. नियमित कर्णधाराच्या अनुपस्थितीत रियान पराग रॉयल्सचे नेतृत्व करेल. ते सध्या चार गुणांसह आठव्या स्थानावर आहेत. आठ सामन्यांत सहा पराभव झालेले असले, तरी त्यांचे यशस्वी जैस्वाल, पराग, शिमरॉन हेटमायर आणि नितीश राणा हे फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि तऊण वैभव सूर्यवंशीने केलेली सुऊवात देखील उत्साहवर्धक आहे.
तथापि, गोलंदाजांकडील भेदकतेचा अभाव त्यांना खूप त्रासदायक ठरला आहे. वानिंदू हसरंगा (6 सामने, 9 बळी) हा त्यांचा आघाडीचा बळी घेणारा गोलंदाज आहे. परंतु श्रीलंकेच्या या फिरकी गोलंदाजाला एका सामन्यात चार बळी घेतल्यानंतर उर्वरित सामन्यांत संघर्ष करावा लागला आहे. जोफ्रा आर्चर (8 सामने, 8 बळी), महेश थीक्षाना (8 सामने, 7 बळी) आणि संदीप शर्मा (8 सामने, 6 बळी) यांची कहाणी देखील अशीच आहे. ते एक तर बळी घेऊ शकलेले नाहीत किंवा धावांचा ओघ रोखू शकलेले नाहीत
संघ-रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : रजत पाटीदार (कर्णधार), फिल सॉल्ट, विराट कोहली, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवूड, सुयश शर्मा, यश दयाल, देवदत्त पडिक्कल, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग, लुंगी एनगिडी, रोमॅरियो शेफर्ड, नुवान तुषारा, मोहित राठी, स्वस्तिक चिकारा, अभिनंदन सिंग.
राजस्थान रॉयल्स : रियान पराग (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, नितीश राणा, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थीक्षाना, संदीप शर्मा, तुषार देशपांडे, शुभम दुबे, कुमार कार्तिकेय, युधवीर सिंह चरक, कुणाल सिंह राठोड, आकाश मधवाल, फजलहक फाऊकी, क्वेना मफाका, अशोक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (जखमी).