MLA राजेश क्षीरसागरांनी घरचा अन् प्रॉपर्टीचा विकास जोरात केलाय, इंगवलेंची बोचरी टीका
शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रतिमेला जलसमाधी दिली
कोल्हापूर : आमदार राजेश क्षीरसागर अपयशी लोकप्रतिनीधी आहेत. विकास कामांसाठी निधी आणायचा आणि स्वत:च्या घरचा व प्रॉपर्टीचा जोरात विकास करायचा हे क्षीरसागर यांचे तत्त्व असल्याचा, आरोप शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख रवीकरण इंगवले यांनी केला.
गांधी मैदानासाठी मंजूर असलेले पाच कोटी रुपयांच्या निधीचे आमदार क्षीरसागर यांनी काय केले हे जनतेला सांगावे. पाच कोटी रुपये कुठे खर्च केले आणि गांधी मैदानाला तळ्याचे स्वरूप का प्राप्त झाले याचेही शास्त्रशुद्ध उत्तर त्यांनी द्यावे, अशी खोचक टीका इंगवले यांनी केली. शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान ते बोलत होते.
अवकाळी पावसामुळे कोल्हापुरातील गांधी मैदानाला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. दरवर्षी पावसाळ्यात मैदानाची अशीच स्थिती होत असल्याने आज शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने येथे आंदोलन केले. आंदोलनादरम्यान, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाचे कडे तोडून शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रतिमेला जलसमाधी दिली. यावेळी पोलीस प्रशासन व कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली.
गांधी मैदानासंदर्भात क्षीरसागर यांच्यावर टीका करताना इंगवले म्हणाले, गांधी मैदानाच्या दुरावस्थेला राजेश क्षीरसागर व महानगरपालिकेचे प्रशासन कारणीभूत आहेत. पाच कोटी निधीचा यांनी गैरवापर केला. मैदानासाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे तिसऱ्यांदा आंदोलन आहे.
खोटं बोला पण रेटून बोला क्षीरसागर यांची प्रवृत्ती अजून सुटलेली नाही. शास्त्रीय अभ्यासपूर्वक डीपीआर तयार करून गांधी मैदानाचा विकास झाला असता. ज्या ड्रेनेज लाईनसाठी पाच कोटी किंवा गांधी मैदानामध्ये पाणी येणारच नाही, अशा खोट्या वल्गना करणाऱ्या राजेश क्षीरसागर यांनी जनतेला उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
पुढे ते म्हणाले, गांधी मैदान आठ महिने तरी सुरक्षित असते. आठ महिन्यांमध्ये खेळाडूंनी चांगल्या प्रकारचा खेळ करावा, म्हणून मैदान सुसज्ज करुन ठेवलं होतं. परंतु पावसाळ्याच्या चार-पाच महिन्यांमध्ये क्रीडा प्रेमी आणि खेळाडूंना मैदान मिळत नाही. यासाठी मार्ग काढणे गरजेचे आहे. पण तो मार्ग काढणे अपयशी ठरलेला आहे.
वादळामुळे कोकणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, तशीच परिस्थिती सुरू आहे. त्यामुळे या सगळ्याचा तपास व्हावा, तपास समिती बसवून राजेश क्षीरसागर यांची इनक्वायरी व्हानी. अन्यथा ते किती भ्रष्ट आहेत हे आम्ही सिद्ध करु शकतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.