रत्नागिरीला आज पावसाचा ‘रेड अलर्ट’; पावसामुळे आतापर्यंत 10 कोटींची हानी
घरे, दुकानांना सर्वाधिक फटका, 82 गावातील 735 शेतकऱ्यांचे नुकसान; 77कुटुंबे, 318 ग्रामस्थांवर स्थलांतराची वेळ
रत्नागिरी प्रतिनिधी
गेले काही दिवस जिह्यात पावसाने अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर सोमवारी दुपारपर्यंत थोडा उसंत घेतला होता. मात्र पुणे वेधशाळेकडून मंगळवारी जिल्ह्याला पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. तर पुढचे दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. पावसामुळे जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 10 कोटी रुपयांची हानी झाली आहे.
पुणे वेधशाळेकडून देण्यात आलेल्या पावसाच्या अंदाजानुसार मगंळवारी रत्नागिरी जिह्यात बहुतांशी ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. महावितरण, जलसंपदा विभाग तसेच महामार्ग विभागासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन सज्ज असल्याचे प्रशासनाकडुन सांगण्यात आले. जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसामुळे आतापर्यंत 10 कोटीहून जास्त रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तवला आहे. यामध्ये घरे, दुकानांना सर्वाधिक फटका बसला असून 82 गावातील 735 शेतकऱ्यांच्या 187.96 हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान दरडीचा आणि पुराचा धोका असलेल्या 77 कुटुंबे आणि 318 ग्रामस्थांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
दोन दिवसात 1 हजार मि.मि. पेक्षा जास्त पाऊस
सोमवारी पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी मागील दोन दिवसात 1 हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. आठ प्रमुख नद्यांपैकी चार नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत होत्या. मात्र जिल्हा प्रशासनाकडून पावसापूर्वी करण्यात आलेले नियोजन आणि वेळेत नागरिकांपर्यत पोहोचवण्यात आलेले संदेश यामुळे जिह्यात अनेक ठिकाणी जीवित हानी टाळता आली असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. सर्व विभागांमधील आपत्ती संदर्भातील नियंत्रण कक्ष 24 तास सुरू आहेत. त्यामुळे घडलेल्या घटनेसंदर्भात वेळेत माहिती मिळून मदत पोहोचवणे शक्य झाले. महामार्गावर दर 40 ते 50 किलोमीटर अंतरावर आपत्ती संदर्भातील यंत्रसामग्री सज्ज ठेवण्यात आली. प्रत्येक धरणांची डागडुजी आणि दुर्घटना टाळण्यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्या. कमी पावसाच्या वेळांचा अंदाज घेऊन धरणांचे विसर्ग सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या. पूरप्रवण आणि दरडप्रवण क्षेत्रात वेळोवेळी पावसासंदर्भातील सूचना देण्यात आल्याने नागरिकही सतर्क होते.
पुरामुळे करण्यात आलेले स्थलांतर
खेड- 49 कुटुंबातील 208 व्यक्ती
चिपळूण -24 कुटुंबातील 99व्यक्ती
गुहागर- 4 कुटुंबातील 11 व्यक्ती
घरे, गोठे आणि मालमत्तांचे 10 कोटीचे नुकसान
कच्ची घरे- 385 रु. 1,44,76,161
पक्की घरे- 225 रु.84,45,420
गोठे- 71 रु. 24,99,801
सार्वजनिक मालमत्ता 62 रु. 52,55,950
खासगी मालमत्ता 46 रु. 34,22,132
दुकाने 534 रु. 7,08,86,655
मृत जनावरे (गाई/म्हशी) 12 रु. 3,30,000