Miraj Accident : रत्नागिरी-नागपूर हायवेवर दुचाकी-कारचा अपघात, एकजण जागीच ठार
दुचाकी आणि चारचाकीची समोरासमोर धडक
मिरज : तालुक्यातील निलजी येथे रत्नागिरी-नागपूर महामार्गावर दुचाकी आणि चारचाकी कारचा अपघात होऊन जमीर ताजुद्दीन मुजावर (29, रा. मालगाव) हा तरुण जागीच ठार झाला. दुचाकीस्वार तरुण चुकीच्या दिशेने आल्यामुळे समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. या अपघातात वाहनांचेही मोठे नुकसान झाले. याबाबत ग्रामीण पोलिसात नोंद आहे.
घटनास्थळारुन मिळालेली माहिती अशी, अक्षय हरिदास माने हे कुटुंबियांना घेऊन कोल्हापूरहून जुनोनीकडे कारमधून निघाले होते. मिरज ते अंकली बायपास रस्त्यावर निलजीच्या हद्दीत एका पेट्रोल पंपासमोर ते आले असता, समोरुन जमीर मुजावर हा दुचाकीवरुन चुकीच्या दिशेने भरधाव वेगात आला. जमीर याची दुचाकी व अक्षय माने यांच्या चारचाकीची समोरासमोर धडक होऊन जमीर हा जागीच ठार झाला.
याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली आली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दुचाकीस्वारच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. याबाबत रात्री उशिरापर्यंत ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.