घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या
रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे दोन कार्यालये फोडणाऱ्या अट्टल चोरट्याला रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून जेरबंद करण्यात आले. स्वप्निल राजाराम मयेकर (३८ रा. खारघर, जिल्हा रायगड सध्या रा. छाया गेस्ट हाऊस, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध मुंबई, ठाणे, पनवेलसह गोवा व गुजरातमध्येही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास मारुती मंदीर परिसरातील ओमकार डेव्हलपर्स व स्टार इन्सुरन्स कंपनी यांचे ऑफिस फोडून चोरी करुन त्यामधून रोख रक्कम व सीसीटीव्ही डिव्हीआर चोरुन नेण्यात आलेला होता. त्याबाबत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घरफोड्यांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी एक पथक तत्काळ नियुक्त करुन गुन्ह्याचा तपास सुरु केला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपास पथकाने घटनास्थळावरील तसेच घटनास्थळाच्या आजूबाजूस असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व गोपनीय बातमीदाराद्वारे मिळालेल्या माहीतीवरुन सदरचे दोन्ही गुन्हे हे मुंबई येथील रेकॉर्डवरील आरोपी स्वप्निल राजाराम मयेकर याने केलेले असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ठाणे, नवी मुंबई, मुंबई व रत्नागिरी इत्यादी ठिकाणी संशयित आरोपी स्वप्नील मयेकर याचा अहोरात्र शोध घेऊन गोपनीय माहीतीच्या आधारे २२ सप्टेंबर रोजी त्यास मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्हयातील आरोपी स्वप्निल राजाराम मयेकर याने वर नमुद दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिलेली असून गुन्हयात चोरीस गेलेला मुद्देमाल, गुन्हा करण्यासाठी वापरलेले साहित्य त्याचेकडून जप्त करण्यात आलेले आहे. तसेच एल.टी.मार्ग पो. ठाणे मुंबई व पनवेल शहरामध्येही गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे.