Ratnagiri Breaking : ४ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू ! खालापूर पोखरवाडीतील घटना
रायगड / प्रतिनिधी
मुंबईतील बांद्रा येथील रिझवी क़ॉलेजच्या विद्यार्थ्यांची पावसाळी सहल खालापूर-खोपोलीमध्ये गेली होती. सोंडाई किल्ल्यावर ट्रेकिंग केल्यानंतर या विद्यार्थ्यांना खालापूर तालुक्यातील पोखरवाडी येथील सत्य साईबाबा बंधाऱ्यात पोहण्याचा मोह झाला आणि इथेच काळाने त्यांच्यावर झडप घातली , बंधाऱ्याच्या पाण्यामध्ये चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. यामुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पावसाळी पर्यटनासाठी मुंबईहून आलेल्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात शुक्रवारी. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली असून हे चारही रिझवी कॉलेजचे विद्यार्थी होते. खालापूर ( जि. रायगड)तालुक्यातील वावर्ले गावच्या पोखरवाडी येथील ही दुर्घटना आहे. येथील सत्य साईबाबा बंधाऱ्याजवळ रिझवी कॉलेजचे ३७ विद्यार्थी-विद्यार्थिनी पावसाळी सहलीसाठी आले होते. यामध्ये १७ मुली व १५ मुलांच्या समावेश होता, हे सर्व विद्यार्थी जवळच असलेल्या कोडाई किल्ल्यावर ट्रेकिंग करता आले होते. तेथून परत जात असताना धावडी नदीवर असलेल्या बंधाऱ्यातील पाण्यामध्ये विद्यार्थ्यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. बंधाऱ्यातील पाण्याचा अंदाज न लागल्याने यातील चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे. एकलव्य सिंग (१७) ईशांत यादव (१९)आकाश माने (२६) आणि रणत बंडा (१८) अशी मृत पावलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
खालापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे आणि कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाली आणि मदत कार्याला सुरुवात करण्यात आली. खालापूर तालुक्यातील काही सामाजिक संस्थेच्या युवकांनी या कामात सहकार्य केले. खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम हेही घटनास्थळी होते.
रायगड जिल्ह्यात पावसाळ्यामध्ये पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मुंबई पुणे शहरातून लाखो तरुण या परिसरामध्ये मौत मजा करण्यासाठी येत असतात. जिल्ह्यातील ठिकठिकाणी असलेल्या बंधाऱ्यातून आणि धरणाच्या पाण्यामध्ये पोहण्याचा मोह न आवरल्याने दुर्घटना घडतात. आणि त्यासाठी दरवर्षी प्रशासनाकडून १४४ कलमान्वये पर्यटकांना बंदी घातली जाते, दुर्दैवाने यावर्षी मात्र प्रशासनाकडून अद्याप आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली नसल्याने वरील दुर्घटना घडली असल्याची चर्चा रायगड जिल्ह्यात केली जात आहे.