साखरपा जाधववाडी येथे जखमी अवस्थेतील बिबट्याचा मृत्यू! दोन जणांवर केला होता हल्ला
- दोन जणांवर केला होता हल्ला
देवरुख : प्रतिनिधी
साखरपा परिसरात दहशत माजवलेला बिबट्या आज जाधववाडी येथे काल हल्ला करण्यात आलेल्या शेजारील गुरांच्या वाड्यात मृत अवस्थेत आढळून आला.आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास आपल्या वाड्यातील सामान काढण्यासाठी गेलेल्या तरुणाला दुर्गंधी आल्याने त्याने पाहीले असता बिबट्या मृत अवस्थेत दिसून आला. यानंतर वन विभागाला संपर्क करण्यात आला. तालुका वनअधिकारी तौफिक मुल्ला आपल्या कर्मचाऱ्यांसहित घटनास्थळी पोचले. त्यांनी प्राथमिक पाहणी करून मृत बिबट्याला बाहेर आणले.काल ज्या ठिकाणी तरुणावर हल्ला झाला होता, त्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वाड्यात बिबट्याचा मृत्यू झाला. काही दिवसापासून जखमी असलेला हा बिबट्या आसरा शोधत असल्याची शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.जखमी असल्याने तो जास्त अंतर पार न केल्याची शक्यता सांगितली.यानंतर त्या बिबट्याला देवरुख येथे नेवून शवविच्छेदन करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
परिसरातील शेकडो नागरिकांची मृत बिबट्या पाहण्यासाठी गर्दी झाली होती.वनविभाग सोबत पोलीस खात्याचे अधिकारी उपस्थित झाले होते.मृत झालेला हा बिबट्या नर जातीचा असून अंदाजे 5 वर्ष इतके त्याचे वय असल्याचा अंदाज आहे.वनविभागाच्या विभागीय अधिकारी गिरीजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका वनअधिकारी तौफिक मुल्ला, पोलीस खात्याच्या सहाय्यक निरीक्षक मुजावर मॅडम यांच्यासमवेत सुरज तेली, आकाश कुडूकर,सहयोग कराडे, अरुण माळी आदी कर्मचारी उपस्थित होते.