वयोवृद्ध-दिव्यांगांची रेशनसाठी फरफट
घरबसल्या रेशन पुरवठा करण्याचा निर्णय कागदावरच : ओटीपीद्वारे पुरवठ्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
रेशनसाठी वयोवृद्ध आणि दिव्यांग लाभार्थ्यांचे हाल होऊ लागले आहेत. त्यामुळे दिव्यांग आणि वयोवृद्ध लाभार्थ्यांना ओटीपीद्वारे रेशनचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. शासनाने वृद्ध आणि दिव्यांगांना घरबसल्या रेशन पुरवठ्याचा निर्णय घेतला होता. मात्र अद्याप हा निर्णय कागदावरच राहिल्याने वयोवृद्ध आणि दिव्यांगांची फरफट होऊ लागली आहे.
ग्रामीण आणि दुर्गम भागात रेशन दुकान चार-पाच किलोमीटर अंतरावर आहेत. दरमहा रेशन घेताना वयोवृद्ध आणि दिव्यांगांचे हाल होऊ लागले आहेत. तर काही लाभार्थ्यांना रेशनविना राहावे लागत आहे. सरकारने आशा लाभार्थ्यांना मोबाईल क्रमाकांवरील ओटीपी व्हेरीफिकेशनसह डोळ्याचे स्कॅनिंग करून धान्य वितरीत करणार असल्याचे सांगितले होते. मात्र अद्याप याची अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे रेशनसाठी दिव्यांग व वयोवृद्धांच्या हालअपेष्टा सुरू आहेत.
वयोवृद्ध, दिव्यांग लाभार्थ्यांकडे कोणी लक्ष देणार का?
जिल्ह्यात वयोवृद्ध आणि दिव्यांग लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र या लाभार्थ्यांच्या सोयीसाठी कोणतीच उपाययोजना नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे दरमहा लाभार्थ्यांचे मात्र हाल होऊ लागले आहेत. त्यामुळे वयोवृद्ध, दिव्यांग लाभार्थ्यांकडे कोणी लक्ष देणार का? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. सद्यस्थितीत माणसी 5 किलो तांदूळ वितरीत केले जात आहेत. हे मासिक धान्य घेऊन जाणे वयोवृद्धांना अशक्य आहे. अशा परिस्थितीत सरकारने ओटीपीद्वारे रेशनचा पुरवठा करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि दिव्यांग-वयोवृद्धांना दिलासा द्यावा.