महिनाभरात ई-केवायसी न केल्यास रेशनकार्डे रद्द
अन्न-नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा यांचा इशारा
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील रेशनकार्डधारकांनी शक्य तितक्या लवकर ई-केवायसी करून घ्यावे. अन्यथा अशी रेशनकार्डे रद्द करण्यात येतील, असा इशारा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी दिला.
म्हैसूर येथे शनिवारी म्हैसूर विभाग स्तरावरील खात्याच्या प्रगती आढावा बैठकीत ते बोलत होते. रेशनकार्डधारकांना ई-केवायसी करण्यास एक महिन्याचा कालावधी द्यावा. तरी सुद्धा त्यांनी ई-केवायसी केले नाही तर अशा कुटुंबांची रेशनकार्डे रद्द करण्याचा इशारा द्यावा. बाकी असणारी ई-केवायसी प्रक्रिया विनाविलंब करण्यासाठी तातडीने पूर्ण करावी, अशी सूचना मुनियप्पा यांनी अधिकाऱ्यांना दिली.
जर अनावश्यक रेशनकार्डांचे वितरण केले गेले असेल तर जिल्हा पातळीवर जागृती समित्या स्थापन कराव्यात. कायदा मापनशास्त्र खात्यासाठी आवश्यक वाहन सुविधा आणि या खात्यासाठी निरीक्षकपदे भरती करण्यासाठी पावले उचलली जातील. गोदामांमध्ये आहारधान्य खराब होणार नाहीत, याची दक्षता घेतली जावी. किमान आधारभूत योजनेंतर्गत खरेदी केलेले धान्य सुरक्षितपणे साठवावे. गोदांमांना अधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेट देऊन पाहणी करावी, अशा सूचनाही मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी दिल्या. अन्न-नागरी पुरवठा, ग्राहक व्यवहार खाते, कायदा मापन विभाग, योजना कार्यक्रम समन्वय आणि सांख्यिकी खात्याचे सचिव मनोज जैन यांनी, खात्यातील रिक्त पदांचा अतिरिक्त पदभार इतर अधिकाऱ्यांवर सोपवावा. रिक्त असणारी अन्न निरीक्षकांची रिक्त पदांसाठी महसूल खात्यातील निरीक्षकांवर अतिरिक्त पदभार सोपवावा, अशी सूचना दिली.