रस्मिका-कपिलकडून भारताला तिसरे सुवर्ण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आयएसएसएफच्या कनिष्टांच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत शनिवारी 10 मी. एअर पिस्तुल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात रस्मिका सेहगल आणि कपिल यांनी भारताला तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले. स्पर्धेच्या पदक तक्त्यात शनिवारी तिसऱ्या दिवशी भारताने आघाडीचे स्थान मिळविताना 3 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्य अशी एकूण 9 पदके मिळविली आहेत. या तक्त्यामध्ये वैयक्तिक त्रयस्त न्यूट्रल अॅथलिट्स (एआयएन) यांनी दोन सुवर्णांसह दुसरे स्थान तर इटलीने 1 सुवर्ण आणि 1 रौप्य पदकासह तिसरे स्थान मिळविले आहे.
कझाकस्तानमध्ये अलिकडेच झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत रस्मिका आणि कपिल यांनी 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजी प्रकारात सुवर्णपदके मिळविली होती. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेतील शनिवारी तिसऱ्या दिवशी मिश्र सांघिक पिस्तुल नेमबाजी प्रकारात भारताच्या नेमबाजांनी अव्वल स्थान मिळविले. रस्मिका आणि कपिल या भारतीय जोडीने 10 मी. एअर पिस्तुल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारातील सुवर्णपदकासाठीच्या लढतीत आपल्याच देशाच्या वनशिखा चौधरी आणि अॅन्टोनी गेव्हीन यांचा 16-10 असा पराभव केला. या क्रीडा प्रकारात स्पेनच्या कॅस्ट्रो आणि सांचेझ यांनी इराणच्या अमिरी आणि अहमदी यांचा 16-14 असा पराभव करत कांस्यपदक घेतले. भारताचा नेमबाज अॅन्टोनी गेव्हीनने शुक्रवारी या स्पर्धेत पुरूषांच्या वैयक्तिक 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. कनिष्ट पुरूषांच्या स्किट नेमबाजी प्रकारात भारताच्या हरमेहर सिंग लॉली आणि राजवत यांना पदक फेरीला मुकावे लागले. ते अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर राहिले. या क्रीडा प्रकारात कोकोने सुवर्ण तर फिनलँडच्या कॉपेनेनने रौप्य आणि सायप्रसच्या पाँटिकीसने कांस्यपदक मिळविले.