राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खानापुरात पथसंचलन
खानापूर : खानापूर तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने खानापूर शहरात रविवारी पथसंचलन करण्यात आले. आरएसएसच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शतक महोत्सवानिमित्त खानापूर शहरात रविवारी आरएसएसच्या 100 व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून हे पथसंचलन करण्यात आले. स्वयंसेवकांनी पांढरा शर्ट, खाकी पँट, काळी टोपी तसेच दंडुकासह शहराच्या मुख्य मार्गावरून पथसंचलन केले. या पथसंचलनाचे शहरात पुष्पवृष्टी तसेच रांगोळ्dया काढून स्वागत करण्यात आले. खानापूर येथील स्वामी विवेकानंद पदवीपूर्व महाविद्यालयाच्या पटांगणातून या पथसंचलनाला दुपारी 4 वाजता सुरुवात करण्यात आली.
प्रारंभी पथसंचलन मार्गाची रूपरेषा व प्रास्ताविक या ठिकाणी झाले. यावेळी खानापूर तालुक्यातील बाळेवाडी मठाचे सिद्धनाथ महाराज, तोलगी मठाचे अदृश्य शिवाचार्य स्वामी, अवरोळी मठाचे चन्नबसव देवरू, कसबा नंदगड येथील मारुती महाराज, तोपिनकट्टी सिद्धाश्रम मठाचे रामदास महाराज, धनंजय स्वामी महाराज उपस्थित होते. या पथसंचलनामध्ये खानापूर तालुक्यातील स्वयंसेवक, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या पथसंचलनाच्या सांगता कार्यक्रमात स्वामी विवेकानंद शाळेच्या प्रांगणात प्रबोधनात्मक विचारमंथन झाले.