मालवणमध्ये राष्ट्र सेविका समितीतर्फे पथसंचलन
मालवण (प्रतिनिधी)
राष्ट्र सेविका समिती सिंधुदुर्ग जिल्हातर्फे मालवणात सघोष पथसंचलन व मकर संक्रमण उत्सव साजरा झाला. यानिमित्त मालवण शहरातून उत्साहपूर्ण वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने सघोष पथसंचलन करण्यात आले. यामध्ये जिल्हाभरातील ९३ राष्ट्रसेविका महिला सहभागी झाल्या होत्या.
राष्ट्र सेविका समिती ही अखिल भारतीय महिला संघटना आहे. लक्ष्मीबाई केळकर यांनी २५ ऑक्टोबर १९३६ रोजी राष्ट्र सेविका समितीची स्थापना केली. महिलांनी केवळ शिक्षित नव्हे तर शारीरिक, मानसिक व बौद्धिक दृष्ट्या सक्षम व्हावे, स्वसंरक्षणक्षम व्हावे, राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन राष्ट्र कार्यात सहभागी व्हावे, ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून समिती गेली ८८ वर्षे कार्य करत आहे. संपूर्ण देशात व परदेशातही समितीच्या अनेक शाखा आहेत. या कार्यपद्धतीचा एक भाग म्हणजे संचलन असून अनुशासान, सांघिक कृतीचा अवलंब हे संचलनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या अंतर्गत कोकण प्रांतात एकाच दिवशी व एकाच वेळी प्रत्येक जिल्ह्यात एक किंवा दोन स्थानी मिळून १६ पथसंचलने करण्यात आली. सुसंघटित समाज - समर्थ समाज असा संदेश या संचलनातून देण्यात आला.
मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलच्या पटांगणावर राष्ट्रसेविका समितीच्या कोकण प्रांत सहसेवा प्रमुख व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालक राजश्री जोग (गोवा) यांच्या विशेष उपस्थितीत हा संचलन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी समितीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कार्यवाहिका मृणाल देसाई उपस्थित होत्या. यावेळी राजश्री जोग यांनी उपस्थित राष्ट्रसेविकांना मार्गदर्शन केले. यावेळी भंडारी हायस्कुल येथून स्वामी हॉटेल मार्गे भरड नाका येथून बाजारपेठ मार्गे फोवकांडा पिंपळपार ते स्वामी हॉटेल कडून पुन्हा भंडारी हायस्कुल या मार्गावर संचलन करण्यात आले.