दुखापतीमुळे रशिद खानची एकमेव कसोटीतून माघार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
अफगाणिस्तानचा स्टार अष्टपैलू रशिद खानला न्यूझीलंडविरुद्ध होणारी एकमेव कसोटी हुकणार आहे. पाठदुखीचा त्रास होत असल्याने त्याने या सामन्यातून माघार घेतली असल्याचे एका क्रीडा वाहिनीने वृत्त दिले आहे. अफगाणमधील स्थानिक टी-20 स्पर्धेत खेळताना गेल्या जुलैमध्ये त्याला ही दुखापत झाली होती. स्फागीझा क्रिकेट लीगमध्ये स्पीन घर टायगर्सकडून तो खेळत होता. न्यूझीलंडविरुद्धची एकमेव कसोटी भारतातील ग्रेटर नोएडा येथे 9 ते 13 सप्टेंबर या कालावधीत खेळविली जाणार आहे. मार्च 2021 मध्ये रशिद खानने अफगाणतर्फे शेवटची कसोटी अबु धाबीत खेळली होती. एकमेव कसोटीतील त्याच्या गैरहजेरीबाबत अधिकृतपणे काहीही स्पष्ट झालेले नाही. कारण अफगाण क्रिकेट मंडळाने याबाबत कोणतेही कारण सांगितलेले नाही. अफगाण संघ याआधीच भारतात दाखल झाला असून ग्रेटर नोएडा येथे त्यांनी सरावही सुरू केला आहे. अफगाणची ही एकूण दहावी कसोटी असून या वर्षातील तिसरी कसोटी आहे.