रशीद शेवटपर्यंत लढला, अखेरच्या चेंडूवर मुकेश जिंकला
रोमांचक सामन्यात दिल्लीचा गुजरातवर चार धावांनी विजय : सामनावीर ऋषभ पंत, अक्षर पटेलची फटकेबाजी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा चार धावांनी पराभव केला. दिल्लीने दिलेल्या 225 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला 8 विकेटच्या मोबदल्यात 220 धावांपर्यंत मजल मारता आली. गुजरातकडून साई किशोर आणि डेव्हिड मिलर यांनी सामना आवाक्यात आणल्यानंतर राशिद खानने दिल्लीला मात देण्याचा शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्न केला. मात्र एका चेंडूवर 5 धावांची गरज असताना मुकेश कुमारने टिच्चून मारा करत गुजरातच्या हातून विजय हिसकावून घेतला. 43 चेंडूत नाबाद 88 धावा व दोन झेल पकडणाऱ्या दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
दिल्लीने दिलेल्या 225 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात निराशाजनक झाली. शुभमन गिल फक्त सहा धावा काढून बाद झाला. पण त्यानंतर साई सुदर्शन आणि वृद्धीमान साहा या दोघांनी अर्धशतकी भागिदारी केली. वृद्धीमान साहाने 25 चेंडूत 39 धावांची खेळी केली. कुलदीप यादवने त्याला बाद केले. यानंतर उमरझाई स्वस्तात परतला. साई सुदर्शनने मात्र दुसऱ्या बाजूनं शानदार फटकेबाजी करताना 39 चेंडूत 65 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. यामध्ये सात चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. साई सुदर्शन बाद झाल्यानंतर डेविड मिलरने तुफानी खेळी करत अवघ्या 23 चेंडूत 6 चौकार व 3 षटकारासह 55 धावा ठोकल्या. फटकेबाजीच्या प्रयत्नात मिलर 18 व्या षटकांत बाद झाला. यानंतर शाहरुख खान आणि राहुल तेवातिया झटपट बाद झाले. मिलर बाद झाल्यानंतर रशीद खानने 11 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. साई किशोरने 6 चेंडूमध्ये दोन षटकाराच्या मदतीने 13 धावांचं योगदान दिलं. दिल्लीला 8 बाद 220 धावापर्यंतच मजल मारता आली.
ऋषभचा धडाका, अक्षरचा तडाखा
प्रारंभी, गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलामी फलंदाज पृथ्वी शॉ 11 धावांवर बाद झाला. जर जेक मॅकगर्कने 14 चेंडूत 23 धावांची खेळी केली. शाय होप याला मोठी खेळी करता आली नाही. होप फक्त पाच धावा काढून बाद झाला. यावेळी दिल्लीची 3 बाद 44 अशी स्थिती झाली होती. अक्षर पटेल आणि ऋषभ पंत यांनी शतकी भागिदारी करत गुजरातच्या स्वप्नावर पाणी फेरलं. अष्टपैलू अक्षर पटेलला फलंदाजीमध्ये बढती देण्यात आली. आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवताना अक्षरने 43 चेंडूमध्ये 66 धावांचा पाऊस पाडला. आपल्या वादळी खेळीमध्ये चार षटकार आणि पाच चौकार ठोकले. दरम्यान, ऋषभ पंतनेही कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. पंतने सुरुवातीला अक्षर पटेलला चांगली साथ दिली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी 113 धावांची भागीदारी साकारली. 17 व्या षटकात अक्षरला नूर अहमदने बाद करत ही जोडी फोडली.
अक्षर पटेल बाद झाल्यानंतर पंतने डावाची सुत्रे हातात घेत गुजरातच्या गोलंदाजाची धुलाई केली. ऋषभ पंत याने 43 चेंडूमध्ये 88 धावांची खेळी केली. पंतने आपल्या विस्फोटक खेळीमध्ये आठ षटकार व पाच चौकार लगावले. पंतला ट्रिस्टन स्टब्जने 7 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारासह नाबाद 26 धावा करत चांगली साथ दिली. पंत आणि स्टब्स यांच्यामध्ये 18 चेंडूमध्ये 67 धावांची भागिदारी झाली. यामुळे दिल्लीने निर्धारित 20 षटकांत 4 बाद 224 धावांचा डोंगर उभा केला.
संक्षिप्त धावफलक : दिल्ली कॅपिटल्स 20 षटकांत 4 बाद 224 (पृथ्वी शॉ 11, मॅकगर्क 23, अक्षर पटेल 66, ऋषभ पंत 43 चेंडूत नाबाद 88, स्टब्ज 7 चेंडूत नाबाद 26, संदीप वॉरियर 15 धावांत 3 बळी, नूर अहमद 1 बळी).
गुजरात टायटन्स 20 षटकांत 8 बाद 220 (वृद्धिमान साहा 39, साई सुदर्शन 65, डेव्हिड मिलर 55, रशिद खान नाबाद 21, साई किशोर 13, रसिक सलाम 3 बळी तर कुलदीप यादव 2 बळी, नोर्तजे, मुकेश कुमार व अक्षर पटेल प्रत्येकी एक बळी).